बोंडआळीवरून विरोधक विधानसभेत आक्रमक

सिद्धेश्वर डुकरे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नियम ९७ अन्वये प्रस्ताव मांडत बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांच्या मागणीला सुरुवातीला नकार दिला.

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट अवकाळी पावसामुळे आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांचे गारपीटीमुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव होवून नुकसान झाल्याचा मुद्दा सत्ताधारी भाजपचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी उपस्थित करत संपूर्ण विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी बोंडअळीचा प्रश्न वेगळा असताना तो गारपीट प्रश्नात समाविष्ट करून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी करत विधानसभेचे कामकाज रोखून धरले. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले.

विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नियम ९७ अन्वये प्रस्ताव मांडत बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांच्या मागणीला सुरुवातीला नकार दिला. त्यावर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने दोनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. यावेळी भाजप आमदार अनिल बोंडे यांनी विरोधकांवर उपरोधिक टीका करीत विरोधकांनो विरोध करण्यासाठी टॉनिक घेवून येत जा ! असे म्हणत विरोधकांना डिवचले.

यावेळी हरकतीचा मुद्दा घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ” आमच्या नियम ९७ अन्वये चर्चा करत प्रश्नोत्तराचा तास रद्द करा म्हणून मागणी केली होती. म्हणून तुम्ही प्रश्नोत्तराचा तास रद्द केला आहे. त्यामुळे आमच्या प्रस्तावावर चर्चा करा, “त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, “तुम्ही चर्चेची मागणी केली, त्यावर मी चर्चा सुरू केली आहे. तुम्ही खाली बसा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच चर्चा सुरू आहे. तुम्ही ऐकून घ्या. जाग्यावर बसा. अनिल बोंडे तुम्ही प्रस्तावावर चर्चा सुरू करा. ”

भाजप आमदार अनिल बोंडे म्हणाले, “विरोधकांचे शेतकऱ्यांवरच प्रेम किती ढोंगी आहे ते कळतयं. शेतकरी प्रश्नावर चर्चा सुरू असताना ते गोंधळ घालत आहेत. विरोधक वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यामुळे ते गोंधळ घालत आहेत. राज्य सरकार एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचा दावा केला.

त्यावर विरोधकांनी फक्त गारपीट प्रश्नावर चर्चा कशाला त्यात बोंडअळीचा प्रस्ताव पण समाविष्ट करण्याची मागणी केली. दरम्यान तिसऱ्यांदा सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावर पुन्हा एकदा विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याप्रश्नी अध्यक्षांच्या दालनात विरोधकांसोबत बैठक घेवून तोडगा काढावा अशी विनंती तालिका अध्यक्ष योगेश सागर यांना केली. त्यानुसार योगेश सागर यांनी पुन्हा सभागृहाचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकूब केले. अखेर सत्ताधारी आणि विरोधकांच्या दोन वेगवेगळे प्रस्ताव एकत्रित करून त्यावर उद्या गुरुवारी चर्चा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

Web Title: Marathi news Maharashtra news farmer cotton