शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधान परिषद तहकूब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

धर्मा पाटील यांना मृत्यूनंतरही न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना मदत करणे तर दूरच, त्यांच्या गळ्यात पाट्या लावून पंचनामे मात्र सुरू आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. गारपिटीत शेतकऱ्यांनी पशुधन गमावले तेव्हा कोंबड्या दगावल्या असतील तर त्याचे शवविच्छेदन करा, असे आदेश अधिकाऱ्यांनी दिले.

मुंबई : कर्जमाफी मिळालेला एकही शेतकरी मला अद्याप भेटलेला नाही. शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही, बोंड अळीचा प्रादुर्भाव, गारपीटग्रस्तांनाही सरकार दिलासा देत नाही. सरकार शेतकऱ्यांना तुघलकी वागणूक देत असल्यामुळे धर्मा पाटीलसारख्या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत, असा आरोप करत मंगळवारी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. 

धर्मा पाटील यांना मृत्यूनंतरही न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना मदत करणे तर दूरच, त्यांच्या गळ्यात पाट्या लावून पंचनामे मात्र सुरू आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. गारपिटीत शेतकऱ्यांनी पशुधन गमावले तेव्हा कोंबड्या दगावल्या असतील तर त्याचे शवविच्छेदन करा, असे आदेश अधिकाऱ्यांनी दिले. इतका तुघलकी निर्णय सरकार कसे काय घेऊ शकते, असा सवालही मुंडे यांनी केला. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सुरवातीला वीस मिनिटे आणि नंतर दिवसभरासाठी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले. 
मंगळवारी विधान परिषदेचे नियमित कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, बोंड अळीचा प्रादुर्भाव, गारपीट आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी केली. गळ्यात पाट्या लावून पंचनामे करता, शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का, असा सवाल त्यांनी या वेळी केला. 17 जिल्ह्यांत दौरा केला; पण कर्जमाफी झालेला एकही शेतकरी भेटला नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलेली बोंड अळीची नुकसानभरपाई मिळालेली नाही. गारपिटीची नुकसानभरपाई मिळालेली नाही. 

यादरम्यान विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभापतींसमोर जमा होत जोरदार घोषणाबाजीला सुरवात केली. या गदारोळातच सभापतींनी स्थगन प्रस्ताव फेटाळला. 

Web Title: Marathi News Maharashtra News Farmers Problems Legislative Council Adjourned