सरकारने दुपारीच दाखवली स्वप्ने - तटकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प बळिराजाला समर्पित केला जात आहे, असे सांगत ही दिशाभूल केली आहे. गेल्या चार वर्षांत केलेल्या दिशाभुलीचे टोक या वर्षीच्या अर्थसंकल्पात गाठले असून, सरकारने भर दुपारीच जनतेला स्वप्ने दाखवल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुनील तटकरे यांनी बुधवारी विधान परिषदेत राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना सरकारवर लगावला.

'राज्याला पुरोगामी राज्य म्हटले जाते. जशी जगात अमेरिका प्रगत आहे, त्याप्रमाणेच देशात महाराष्ट्र राज्य प्रगत आहे. परंतु आर्थिक शिस्त गुंडाळून ठेवत राज्याची अब्रू देशाच्या वेशीवर टांगण्याचे काम या सरकारने केले आहे. राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकारच्या हातात आणा नसतानाही नुसत्या घोषणा केल्या जात आहेत. भर दुपारी दोन वाजता पहाटेचे स्वप्न कसे पाहावे, हे सत्तारूढ पक्षाने करून दाखवले. सत्तारूढ शिवसेनेने अर्थसंकल्पावर टीका करणे गंभीर आहे. राज्यातील जनतेच्या खिशात काहीच पडणार नाही, याची कबुलीच एकप्रकारे दिली आहे,'' असे तटकरे म्हणाले.

या वर्षीच्या अर्थसंकल्पात 15 हजारांची तूट दाखवली गेली. कारण गेल्यावर्षी खूप पुरवणी मागण्या केल्या गेल्या. आम्ही दोन हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या, की गदारोळ केला जायचा; पण या सरकारने पुरवणी मागण्या मांडण्याचा विश्वविक्रम केला आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. कोकण विभाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात आत्महत्या होत आहेत. सातारा, नाशिकसारख्या संपन्न भागातही आत्महत्या होत आहेत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कृषिमालाचे प्रचंड प्रमाणात उत्पादन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात आत्महत्या होत असतील तर दुर्दैव आहे. याच नाशिक जिल्ह्यात लोकांनी फलक लावून "पवार साहेब आमची चूक झाली,' असे संदेश लिहिले होते, असेही तटकरे म्हणाले.

Web Title: marathi news maharashtra news government budget sunil tatkare