कोल्हापुरपेक्षा लहान त्रिपुरा जिंकल्यामुळे हुरळू नका - जयंत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - ईशान्य भारतातील निवडणुकीत त्रिपुरा राज्यात विजय मिळविल्याचा जल्लोष भाजपकडून साजरा करण्यात येत आहे. मात्र त्रिपुरा राज्य आहे तरी केवढे, असा उपरोधिक सवाल करत आमच्या कोल्हापूरच्या महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषदेचे मतदारसंघ मोठे आहेत. त्यामुळे अशा छोट्या मतदारसंघात विजय मिळविल्याने फार हुरळून जाऊ नका, असा उपरोधिक टोला लगावत महाराष्ट्राच्या मातीत या मग दाखवतो, असे आव्हान सत्ताधारी भाजपच्या सदस्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी दिले.

अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी विधानसभेत ते बोलत होते. 'भाजपची एकेकाळी हवा होती. आता ती स्थिती नाही. केंद्राच्या अर्थसंकल्पातील आरोग्य विम्याचा उल्लेख केला. केंद्राने नागरिकांना पाच लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचे कवच दिले आहे. याचा साधा उल्लेखही राज्याच्या अर्थसंकल्पात नाही. या आरोग्य कवचासाठी राज्याने काय तरतूद केली आहे, याचा खुलासा अर्थमंत्र्यांनी करावा,'' अशी मागणी पाटील यांनी केली.

यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्रिपुरा...त्रिपुरा असे म्हटले. भातखळकर यांच्या या कोटीला जयंत पाटील यांनी उत्तर देताना भाजप वर सडकून टीका केली. कोल्हापूर जिल्ह्यापेक्षाही लहान राज्यात जिंकल्याने जास्त हुरळून जाऊ नका, महाराष्ट्राच्या मातीत या मग तुम्हाला दाखवतो. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने जय्यत तयारी केली आहे. ग्रामीण भागात जाऊन बघा, आता काय स्थिती आहे ते तुम्हाला कळेल, असा टोला त्यांनी भातखळकर यांना लगावला.

आपल्या भाषणाच्या शेवटी ते म्हणाले, की राजस्थान आणि कर्नाटकातल्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकलांकडे आधी बघा मग बोला. मध्य प्रदेशातही भाजपची स्थिती चांगली नसल्याचे बोलले जात असल्याकडे लक्ष वेधत यावरही बोला, असे प्रतिआव्हानही त्यांनी या वेळी सत्ताधारी सदस्यांना दिले.

Web Title: marathi news maharashtra news jayant patil