काँग्रेसकडून कुमार केतकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

राज्यसभेतील 58 जागा रिक्‍त होणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे.

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आज (सोमवार) उमेदवारी अर्ज दाखल केला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आ. गणपतराव देशमुख, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा. जोगेंद्र कवाडे, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम आधी नेते यावेळी उपस्थित होते.

राज्यसभेतील 58 जागा रिक्‍त होणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. राज्यातील विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता सहा जागांपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. भाजपचे तिन्ही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि केरळमधील व्ही. मुरलीधरन यांचा समावेश आहे. जावडेकर यांनी याआधीच उमेदवारी अर्ज दाखल केला असून राणे यांंनी आज अर्ज दाखल केला.

विधानसभेतील संख्याबळानुसार कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची प्रत्येकी एक जागा निवडून येऊ शकते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने वंदना चव्हाण; तर शिवसेनेने अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली आहे.

Web Title: Marathi news Maharashtra news Kumar Ketker files nomination for Rajya Sabha