लोकसभा निवडणुकीसाठी संघ "दक्ष' ; सरकार्यवाहपदी अनुभवी भय्याजी जोशी कायम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

सरकार्यवाहपदी तीन "टर्म' राहिल्यामुळे जोशी यांना बदलून त्यांच्या जागी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात येईल, असे मानले जात होते. परंतु, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मागे संघाची ताकद एकत्रितपणे उभी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे जोशी यांच्याकडे हे पद कायम ठेवण्यात आले आहे.

नागपूर : कर्नाटकसह अन्य राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका; तसेच त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मागे भक्कमपणे उभे राहण्यासाठी संघ "दक्ष' झाला आहे. आगामी निवडणुकांचे महत्त्व ध्यानात घेता संघाने सरकार्यवाह या क्रमांक दोनच्या पदावरील सुरेश उपाख्य भय्याजी सोनी यांना पुढील तीन वर्षांसाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भय्याजी जोशी यांची सरकार्यवाहपदाची ही चवथी "टर्म' असेल. 

सरकार्यवाहपदी तीन "टर्म' राहिल्यामुळे जोशी यांना बदलून त्यांच्या जागी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात येईल, असे मानले जात होते. परंतु, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मागे संघाची ताकद एकत्रितपणे उभी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे जोशी यांच्याकडे हे पद कायम ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या बैठकीत कर्नाटक निवडणुकीसाठी संघाचे शंभर पूर्णवेळ कार्यकर्ते तेथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, हे विशेष. 

सरकार्यवाह जोशी यांच्या नियुक्तीची मुदत संपल्यामुळे प्रतिनिधी सभेच्या बैठकीत आज या पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यात जोशी यांचेच नाव पुढे आल्याने त्यांची एकमताने निवड करण्यात आली. पश्‍चिम क्षेत्राचे भाग संघचालक जयंत भाडेसिया यांनी जोशी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यांचा प्रस्तावाला पूर्व उत्तर प्रदेश क्षेत्राचे संघचालक वीरेंद्र पराक्रमादित्य यांच्यासह दक्षिण क्षेत्राचे कार्यवाह राजेंद्रन, कोकण क्षेत्राचे प्रांत सहकार्यवाह विठ्ठल कांबळे आणि आसाम क्षेत्राचे कार्यवाह डॉ. उमेश चक्रवर्ती यांनी समर्थन दिले. संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांच्या निवडीची माहिती दिली. 

सरकारविरोधी सूर नाही 

संघाच्या प्रतिनिधी सभेतील आतापर्यंच्या बैठकांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात कुठलाही सूर उमटला नाही. दुसरीकडे प्रतिनिधी सभेने राजकीय आणि आर्थिक विषयांवरील ठराव न घेण्याचा निर्णय घेतला. याआधीच्या सभांमध्ये राजकीय आणि आर्थिक विषयांवरील ठरावांवर सरकारच्या विरोधात मतप्रदर्शन झाले आहे. यंदा हे न झाल्याने 2019 च्या निवडणुकीत संघ संपूर्ण ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Web Title: Marathi News Maharashtra News Nagpur News RSS Bhayyaji Joshi