राज्यसभेवर सहा जण बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नारायण राणे पहिल्यांदाच संसदेत; रहाटकरांच्या माघारीने चुरस टळली
मुंबई - भाजपच्या विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यातील सहाजण बिनविरोध निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचाही यात समावेश असून, ते पहिल्यांदाच संसदेत जात आहेत.

नारायण राणे पहिल्यांदाच संसदेत; रहाटकरांच्या माघारीने चुरस टळली
मुंबई - भाजपच्या विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यातील सहाजण बिनविरोध निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचाही यात समावेश असून, ते पहिल्यांदाच संसदेत जात आहेत.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक होत असताना विधानसभेतील संख्याबळानुसार या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला. भाजपकडून सुरवातीला तीन जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळी चौथा उमेदवार अर्थात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी अर्ज भरला होता.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून विद्यमान राज्यसभा खासदार अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपकडून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाचे प्रमुख नारायण राणे आणि केरळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे पदाधिकारी व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, भाजप उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तांत्रिक कारणामुळे उमेदवारी अर्ज रद्द ठरू शकेल म्हणून भाजपकडून पर्यायी उमेदवारी म्हणून विजया रहाटकर यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला.

काल (बुधवारी) अर्ज छाननीत सर्वच उमेदवारांचे अर्ज पात्र ठरल्याने सातवा उमेदवार रहाटकर या उमेदवारी कायम ठेवतात की मागे घेतात, याकडे भाजप वगळता सर्व पक्षांचे लक्ष लागले होते. मात्र आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतल्याने आता राज्यसभेच्या निवडणूक आखाड्यात असलेल्या सहाही उमेदवारांचा विजय निश्‍चित झाला आहे. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ४२ मतांचा कोटा आहे. काँग्रेसकडे दोन संभाव्य बंडखोर आमदारांची शक्‍यता गृहीत धरून ४२ मतांची जुळवाजुळव करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनेही ४२ मतांची जुळवाजुळव केली आहे. शिवसेनेकडे त्यांच्या उमेदवाराच्या विजयासाठी आवश्‍यक असलेल्या मतांपेक्षा जास्त मते आहेत. तसेच, भाजपकडेही त्यांचे तिन्ही उमेदवार निवडून येण्याइतपत मतांची अर्थात आमदारांची संख्या आहे. त्यामुळे रहाटकर यांच्या माघारीने सहा जणांचा विजय निश्‍चित झाला आहे.

Web Title: marathi news maharashtra news narayan rane rajyasabha politics