नितेश यांच्यासह राणे समर्थक वाऱ्यावर?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 मार्च 2018

मुंबई - कॉंग्रेसमधून बाहरे पडून स्वाभिमानी पक्ष स्थापन केलेले आणि भाजपप्रणित एनडीएचा घटक पक्ष असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी देऊ केली आहे. वास्तविक, राणे यांना दिल्लीपेक्षा राज्यातील मंत्रिमंडळात स्वारस्य होते. भाजपने राणे यांची इच्छा पूर्ण केली नाही. मात्र राणे दिल्लीला जाण्यास राजी झाले असले, तरी राणे यांचे पुत्र नितेश राणे व राणे समर्थक यांचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

भाजपने शिवसेनेविरोधात राणे यांचा अस्त्र म्हणून वापर करण्याची रणनिती आखली असताना शिवसेनेने राणे जर मंत्रिमंडळात येतील तर शिवसेना बाहेर पडेल, असे जाहीर करून टाकल्याने राणे यांचा राज्य मंत्रिमंडळातील पत्ता कट झाला. कारण राणे यांच्यावरून शिवसेनेने बाहेर पडणे भाजपला परवडणारे नाही, हे भाजपला कळून चुकले आहे.

त्यामुळे राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश केवळ चर्चेचा विषय राहिला होता. शेवटी राणे यांनीदेखील वर्तमान राजकीय परिस्थिती ध्यानात घेऊन नाईलाजास्तव राज्यसभेवर जाण्याचे पसंत केले असले, तरीही राणे यांच्या समर्थकांचे काय, असा सवाल निर्माण होतो. खुद्द राणे यांचे पुत्र नितेश राणे हे कॉंग्रेस पक्षात आहेत; तर राणे यांचे दुसरे समर्थक आमदार कालिदास कोळंबकर हेदेखील कॉंग्रेस पक्षात आहेत. किमान या दोघांच्या बाबतीत नेमका काय निर्णय भाजप श्रेष्ठी घेणार आहे, यावर यांचे भवितव्य अवलंबून आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अजून वर्ष-दीड वर्षाचा अवधी असला तरीही या दोन्ही निवडणुका एकाचवेळी होतील, असा कयास बांधला जात आहे. त्यामुळे राणे समर्थक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्यांचे नेमके काय होणार, याबाबत सांशकता आहे.

Web Title: marathi news maharashtra news nitesh rane politics