महाराष्ट्राचे दूरदर्शी, दिलदार नेतृत्व हरपले!: विखे पाटील

Patangrao Kadam
Patangrao Kadam

मुंबई : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे राज्यातील एक दूरदर्शी व दिलदार नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आ.डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, नागपूर अधिवेशनात आम्ही एकत्र होते. त्यानंतर ते असे अचानक आजारी पडतील आणि जगाचा निरोप घेतील, अशी शंकाही कधी जाणवली नाही. आजारपणातून ते बरे होऊन परततील, अशी आशा आम्ही बाळगून होतो. मात्र नियतीने त्यांच्यावर घाला घालून राज्यातील एक उमद्या मनाचे नेतृत्व हिरावून घेतले.

डॉ. पतंगराव कदम यांनी महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रात भरीव योगदान दिले. सहकार, शिक्षण, कृषी क्षेत्रासह राजकारण व समाजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका वठवली. राज्यातील विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळली. संघटनात्मत पातळीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्येही त्यांनी मागील अनेक वर्ष ते सक्रिय भूमिका बजावत आले.

डॉ. पतंगराव कदम राज्यातील लोकप्रिय व जाणकार नेते होते. अनेक वर्ष राज्यस्तरावर काम करतानाही त्यांनी जमिनीशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संबंध होता. आपल्या साध्या-सरळ स्वभावाने माणसे जिंकण्याची विलक्षण कला त्यांना लाभलेली होती. अत्यंत गंभीर प्रश्नांनाही सहजपणे हाताळण्याचा अंगीभूत गूण त्यांच्याकडे होता. अत्यंत हजरजबाबी व प्रसन्न व्यक्तीमत्वाचे ते धनी होते. इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याची निसर्गदत्त कला त्यांना प्राप्त होती, या शब्दांत विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विखे पाटील कुटुंबाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या सोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले. सरकार व विधानसभेत काम करताना मला देखील नेहमीच त्यांचे मार्गदर्शन लाभत आले. त्यामुळे त्यांच्या निधनाने माझी मोठी व्यक्तीगत हानी झाल्याचे सांगून राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com