धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली: शिवसेना

Shiv Sena
Shiv Sena

मुंबई : भाषणबाजीने रोटी, कपडा आणि निवाऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली आहे. जे घडले ते विदारक आहे. याला राज्य करणे म्हणता येत नाही. मुख्यमंत्री राज्य चालवा, भाजप चालवू नका. धर्मा पाटलांच्या मृतदेहावर तुमचे राज्य आहे. धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकील. धर्मा पाटील यांना मृत्यूस कवटाळावे लागले. कारण अधर्माच्या राज्यात त्यांचे ऐकणारे कुणी नव्हते. भाषण माफियांना डोलणारी व टाळ्य़ा वाजवणारी माणसे हवी आहेत. त्यामुळे ‘धर्मा’ पाटलांचे सत्य कोण ऐकणार?, अशी जोरदार टीका शिवसेनेने मित्रपक्ष भाजपवर केली आहे.

शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनानंतर सरकारवर चौबाजूने टीका होत आहे. आता मित्रपक्ष शिवसेनेनेही 'सामना' या मुखपत्रातून भाजपला लक्ष्य केले आहे. शिवनेनेने यापूर्वीही भाजपला अनेक मुद्द्यांवरून टीका केलेली आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की धर्माजी पाटील यांची प्राणज्योत मालवली आहे, पण त्या विझलेल्या जिवाने महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या मनात जगण्या-लढण्याची ठिणगी पेटवली आहे. धर्मा पाटील हे धुळ्य़ातले सधन शेतकरी. ८४ वर्षांचा हा वृद्ध शेतकरी मुंबईत मंत्रालयाच्या दारात न्याय मागण्यासाठी येतो व न्याय नाकारला जातो तेव्हा त्याच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करतो, राज्य उत्तम चालल्याचे हे लक्षण नाही. राज्यात व देशात ‘अच्छे दिन’ आले व सर्वत्र आबादी आबाद आहे असे चित्र रंगवणाऱ्या थापेबाज टोळीने धर्मा पाटील यांची हत्या केली आहे. धर्मा पाटील यांची सुपीक शेतजमीन ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारने संपादित केली, पण त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. पाच एकर जमिनीच्या बदल्यात त्यांना फक्त चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.

धर्मा पाटील यांनी मंत्रालयाच्या पायरीवर आत्महत्या केली त्या पायरीसमोर छत्रपती शिवरायांची भव्य तसबीर आहे. शिवरायांचे नाव घेऊन जे लोक राज्य करतात ते शिवरायांच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. शिवराय हे रयतेचे राजे होते. त्यांच्या काळात एखादा शेतकरी न्याय मागण्यासाठी दरबारात आला असता व अन्याय दूर न झाल्याने त्याने विष प्राशन केले असते तर छत्रपतींनी दरबारातील सरदार, वतनदारांचा कडेलोट केला असता, असेही सेनेने अग्रलेखात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com