सरकारने आपल्या संवेदना जाग्या कराव्यात: तटकरे

Sunil Tatkare
Sunil Tatkare

: सुनील तटकरे 

मुंबई : मन विषण्ण करणारा असा हा लाँग मार्च मुंबईत आला आहे. गेले दोन तीन दिवस माध्यमांनी दखल घेतल्यामुळे आमचा शेतकरी, आदिवासी समाज ज्या हालअपेष्टा भोगत आहे त्या मुंबईकरांना दिसल्या. त्यामुळे मुंबईकरांच्या संवेदनाही या मोर्चामुळे जगाला दिसल्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

तटकरे म्हणाले, की श्रमजीवी इतका दिर्ध प्रवास करत रक्ताळलेल्या पायांनी विधानभवनावर येत आहे हे पाहून कधीही न थांबणारी मुंबापुरी आज थांबलेली आहे. सत्ता ही क्षणार्धात कोसळू शकते हे या लाँग मार्चमधून दिसते. कर्जमाफीच्या बाबतीत सरकारने आज-उद्या, आज-उद्या करत कर्जमाफीला उशीर केला. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते विरोधात असताना मराठवाड्यात अनवाणी फिरले, मात्र मंत्री झालेले रावते आज शांत बसलेले आहेत. लाल झेंडा हातात घेऊन आलेले हे शेतकरी, आदिवासी संख्येने कमी असले तरी त्यांची उपेक्षा करु नका. अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजना, संजय गांधी निराधार योजना या आघाडी सरकारच्या काळात सुरु केल्या होत्या. आज या योजनांची बिकट अवस्था आहे. या योजना पुन्हा कार्यान्वित करा, अशी त्यांची मागणी आहे. नार-पारचे गुजरातला जाणारे पाणी खान्देशातील आदिवासींना मिळावे, ही देखील त्यांची मागणी आहे. निरभ्र आकाशाकडे पाहत लाल बावटा घेतलेल्या लाँग मार्च कसारा घाटातून चालत असलेले विहंगम चित्र जेव्हा सोशल मिडियावर वायरल झाले तेव्हा सरकार खडबडून जागे झाले. त्यांना वाटले होते शे-पाचशे जणच मुंबईत पोहोचतील. चार-दोन काॅम्रेड भेटायला येतील. पण या आंधळ्या सरकारचे डोळे उघडणारा हा मार्च आहे.

शिवसेना व कम्युनिस्ट पक्षाचे वैचारिक मतभेद असतील. पण जेव्हा कष्टकऱ्यांचा विषय येतो तेव्हा सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक भूमिका घ्यायला हवी. एखाद्याला एकदा फसवता येईल. मात्र सदासर्वकाळ सर्वांना फसवता येत नाही. सरकारने या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या संवेदना जाग्या कराव्यात. वन जमिन संपादित करण्यासाठी सरकारने इच्छाशक्ती दाखवावी. सर्व अधिकारी एकत्र बसवून निर्णय घ्यावा. या कष्टकऱ्यांचा अंत न पाहता त्यांच्या मागण्यांचा विचार करावा नाहीतर या सरकारचा अंत होईल, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com