आभासी चलनाद्वारे फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - 'गेट बिटकॉईन' या संकेतस्थळाच्या आधारे पॉन्झी योजना सुरू करून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आभासी चलनाद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांवर महाराष्ट्र ठेवींवरील व्याजाचे संरक्षण (एमपीआयडी) या कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे. आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

डॉ. पाटील म्हणाले, की या आभासी चलनाचा वापर करून पुणे आणि नांदेड येथील गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. "पॉन्झी स्कीम' सुरू करून, नवी दिल्ली येथील अमित भारद्वाज, नांदेड येथील अमोलकुमार थोंबाळे, बालाजी पांचाळ, राजू मोतेवार आणि इतरांनी नांदेड येथील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित अमोलकुमार थोंबाळे याला अटक झाली आहे. उर्वरित आरोपींचा तपास सुरू आहे. मुख्य आरोपी अमित भारद्वाज हा परदेशात राहत आहे. त्याच्याविरुद्ध "लूक आऊट' नोटीसची कार्यवाही सुरू आहे.

पुण्यातील प्रकरणामध्ये संबंधितांचे खाते सील करण्यात आले आहे. पाच कोटी 96 लाख रोख आणि ई-वॉलेटमधून दोन कोटी 42 लाख रुपये गोठवण्यात आले आहेत.

गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत, यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) हे प्रकरण देण्याचा सरकार विचार करीत आहे. सायबर गुन्ह्यांची तपासणी करण्यासाठी 35 सायबर पोलिस ठाणी निर्माण केली आहेत. त्यांच्या साह्याने आणि राज्य सरकारच्या महाराष्ट्र सायबरच्या सर्वोच्च केंद्राद्वारे या प्रकरणांचा तपास सुरू आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य आशीष शेलार, शंभुराज देसाई यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: marathi news maharashtra news Virtual currency cheating crime ranajit patil