प्रबोधनकारांचा वारसा सांगणारा पक्ष उरला 'नाटका' पुरता

गुरुवार, 22 जून 2017

राज्यात सत्तेत आहोत की विरोधात आहोत याबाबत सतत गोंधळलेल्या अवस्थेत असलेली पण एकेकाळी अत्यंत आक्रमक असलेली शिवसेना शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख्या खमक्या नेत्यांनी आपले समाजसुधारक पिता कै. प्रबोधनकार ठाकरे यांच्या साक्षीने स्थापन केली आहे. अशा या आक्रमक पक्षाच्या स्थापनेच्या दिवशी कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी एखादा चांगला कार्यक्रम देण्याऐवजी 'साखर पेरलेली माणसं' असे नाटक दाखवण्यात आले. त्यामुळे प्रबोधनकारांचा वारसा सांगणारा पक्ष उरला 'नाटका' पुरता असेच म्हणावे लागेल.

शिवसेनेच्या काळात 'असे होते - तसे होते', असे सांगणारे आज नाक्या- नाक्यांवर व चौका चौकात भेटतात. 1995 चा शिवशाहीचा काळ आज लोकं आठवणीने सांगतात. त्यावेळी म्हणे 'शेतकऱ्यांचे काम फक्त त्यांच्या गळ्यात असलेले भगव्या टाॅवेल-उपरणे किंवा गमजा म्हणा हे बघून व्हायचं. त्याला कुणा पुढाऱ्याला फोन करायची गरजच भासायची नाही,' असे सांगणारे लोक गावागावात भेटतील. मग आता नेमका कुणाचा काळ आहे?, असा प्रश्न सामान्यांना पडला तर नवल वाटायला नको.

एकंदर आजच्या घडामोडी पाहता शिवसेनेला भूतकाळातच रमावे लागणार असल्याचे दिसते आहे. राज्याच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी सहा महिने उशिर करणाऱ्या शिवसेनेने अगोदरच उशिर केला आहे. नाही होय करत शिवसेना सत्तेत सहभागी झाली. यामुळे शिवसेनेला पाच कॅबिनेट तर सात राज्यमंत्रीपदांचा वाटा मिळाला. पण सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेना इमानेइतबारे विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाची बित्तंबातमी वाचण्यासाठी क्लिक करा

राज्यातील सत्तेत असलेल्या आपल्या मंत्र्यांच्या विरोधातच शिवसेनेच्या आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. राज्यात पक्ष वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 'शिवसंपर्क' चा घाटही घातला होता. मात्र, 'शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही,' या आपल्या भूमिकेवरुन शिवसेनेने घूमजाव केला. ही शिवसेनेच्या राजकारणातील सगळ्यात मोठी चूक ठरण्याची भिती आहे. दुसरीकडे राजिनामा खिशात घेऊन फिरणाऱ्या मंत्र्यांना मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारमधून बाहेर पडावेसे वाटत नाही, ही स्थिती आहे.दुसऱ्या बाजूला पक्षप्रमुख मात्र 'हिम्मत असेल तर मुदतपूर्व निवडणुक घ्या' असे आव्हान देतात. पण सरकारमधून बाहेर मात्र पडत नाहीत. वाघाचे चिन्ह मिरवणाऱ्या आक्रमक पक्षसंघटनेला इतकी हतबलता यावी यापेक्षा वाईट काय आहे.

अगदी मरेस्तोवर मार खाऊनही शिवसेना न सोडलेले कित्येक तरूण मी पाहिले आहेत. पण तेही आता उघड उघड पक्षाच्या विरोध बोलत आहेत. आमदारच नाही तर सामान्य शिवसैनिकही पक्षाच्या धरसोडीच्या धोरणांमुळे कंटाळले आहेत. आमदारच आपले काम होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडत आहेत पण लक्षात कोण घेणार?येणाऱ्या काळात लढाऊ शिवसेनेचा सूर्य धरसोड वृत्तीमुळे आणि ठाम भूमिका न घेण्यामुळे मावळतो की काय, अशी गंभीर परिस्थिती असताना 'मातोश्री'वर मात्र शांतता आहे. हीच शांतता शिवसैनिकांच्या मनात अस्वस्थता वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. अशा वेळेस पक्षप्रमुख मात्र नाटकात रमत असतील तर प्रबोधनकारांचा वारसा अन् बाळासाहेबांचा बाणा सांगणारा पक्ष उरला 'नाटका' पुरताच असेच नाईलाजाने नमूद करावे लागणार आहे.

काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात?

पुण्यात 'हज हाऊस' करण्यासाठी प्रयत्न करू : शरद पवार

21 कोटींची कामे मंत्र्यांनी रोखली

शिवसेना - भाजपमध्ये नव्याने मैत्रीचे वारे !

उद्धव ठाकरे यांना मुनगंटीवारांनी भेट दिला आवाज करणारा वाघ

Web Title: marathi news maharashtra politics Shiv Sena Uddhav Thackray