निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरू 

निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरू 

मुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या निर्णयानंतर शिवसेनेकडून राज्यातील 48 लोकसभा व 288 विधानसभा मतदारसंघांतील अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. संबंधित सर्वेक्षणाचा अहवाल येत्या दोन दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात येणार असून, लगेच उमेदवारनिश्‍चितीची कार्यवाही सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, भाजपकडे असलेल्या जागांवर पूर्ण ताकदीनिशी उमेदवार उतरविण्याची शिवसेनेची रणनीती असून, त्या दृष्टीने उमेदवार चाचपणी सुरू झाली आहे. 

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती करून लढले होते. यामुळे भाजपला तब्बल 23, तर शिवसेनला 18 जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेस दोन, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस चार जागांवर विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली आणि भाजपने 123 तर शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. केंद्र आणि राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी झाली असली, तरी गेल्या चार वर्षांत दोन्ही पक्षांतील दुरावा कमी झाला नाही. गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजपची युती तुटल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच भविष्यात युतीसाठी कुणाच्याही दारी कटोरा घेऊन जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. 

सध्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांपासूनच तयारी सुरू केली आहे. यासाठी शिवसेनेने राज्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचे अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण केले आहे. शिवसेनेतीलच स्थानिक पदाधिकाऱ्यांना कुणकुण लागू न देता हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी एका जिल्ह्यातील मतदारसंघाचे सर्वेक्षण लांबच्या दुसऱ्याच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पूर्ण केला आहे. अत्यंत गुप्तपणे झालेल्या सर्वेक्षणात लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवार कोण असेल, याचा अंदाज घेण्यात आला. संभाव्य उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे तो उमेदवार कुठल्याही आमिषाला बळी होणार नाही, अशा निकषांच्या पातळीवर हे सर्वेक्षण करण्यात आले. या संदर्भातील अहवाल तयार असून, येत्या दोन-तीन दिवसांत उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला जाणार असून, संभाव्य उमेदवारांची नावे निश्‍चित करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. 

लोकसभेतच झटक्‍याची तयारी 
भाजपच्या दृष्टिकोनातून लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. कारण, उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक खासदार देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे लक्ष आहे. त्यांचे हे मनसुबे उधळून लावण्याचा शिवसेनेने निर्णय घेतला आहे. यासाठी भाजपच्या ताब्यात असलेल्या लोकसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांची प्राथमिक यादी तयार आहे. या उमेदवाराला आर्थिक बळ देण्याबरोबरच निवडून आणण्यासाठी स्थानिक मंत्री किंवा पालकमंत्री यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. शिवसेनेचा उमेदवार पडला तरी चालेल; मात्र भाजपलाही ही जागा मिळू द्यायची नाही, अशा तयारीत शिवसेना उतरणार असल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com