राणे की शायना एनसी?; राज्यसभेबाबत उत्कंठा शिगेला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

राज्यसभेतील 58 जागा रिक्‍त होणार असून, त्यापैकी महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यासाठी येत्या 23 मार्च रोजी मतदान होणार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा पहिल्यापासूनच विरोध आहे.

मुंबई : भाजपच्या केंद्रीय निवड समितीत नारायण राणे यांचे राज्यसभेसाठी नाव निश्‍चित करण्यात आले आहे; मात्र राणे यांच्या भूमिकेकडे भाजपचे लक्ष लागले असून, उद्या (ता.4)याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीत विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या तीन जागा निवडून येणार असून, दोन जागांसाठी उमेदवार निश्‍चित झाल्याचे सांगण्यात आले आहे. एका जागेसाठी नारायण राणे किंवा शायना एनसी यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. 

राज्यसभेतील 58 जागा रिक्‍त होणार असून, त्यापैकी महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यासाठी येत्या 23 मार्च रोजी मतदान होणार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा पहिल्यापासूनच विरोध आहे. त्यामुळे भाजपने राणेंना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमधून अनेक इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. राज्यसभेच्या एकूण सहा जागांपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात. त्यामुळे या तीन जागांसाठी कोणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता आहे. नारायण राणे राज्यसभेवर जाण्यास इच्छुक नसल्यास शायना एनसी यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. इतर दोन जागांसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री असून, ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील; तर धर्मेंद्र प्रधान हे विद्यमान केंद्रीय पेट्रोलियममंत्री आहेत. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत असल्याने, त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली जाणार आहे. 

दरम्यान, विधानसभेतील संख्याबळानुसार कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची प्रत्येकी एक जागा निवडून येऊ शकते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने वंदना चव्हाण; तर शिवसेनेने अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली आहे. कॉंग्रेसचा उमेदवार उद्या निश्‍चित होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

Web Title: Marathi news Mahsrashtra news Narayan Rane Shina NC rajya sabha