मुंबईच्या किनारपट्टीवर मराठ्यांचे भगवे वादळ

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक मोर्चा होईल या इर्षेनं विक्रमी संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकवटलेल्या समाजामुळे मुंबईतील रस्ते भगवे झाले आहेत. एकच चर्चा मराठा मोर्चा, असं वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई - मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकले असून, जणूकाही अरबी समुद्राच्या किनारी भगवे वादळ तयार झाले आहे. अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा बांधव एकवटले आहेत.

मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक मोर्चा होईल या इर्षेनं विक्रमी संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकवटलेल्या समाजामुळे मुंबईतील रस्ते भगवे झाले आहेत. एकच चर्चा मराठा मोर्चा, असं वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यभरातील मराठा बांधव मुंबईच्या वेशीवर मंगळवारपासूनच पोचण्यास सुरवात झाली होती. या मोर्चासाठी मराठा संयोजक समिती, मराठा स्वयंसेवक, पोलिस व वाहतूक प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे चित्र होते. मुंबईत किमान पन्नास हजार वाहनांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे, तर मोर्चामुळे दक्षिण मुंबईतल्या सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

दादर येथील शिवाजी मंदिरमधील वॉर रूममधून नियोजनावर करडी नजर ठेवली जात आहे. देशातला सर्वांत मोठा मोर्चा होण्याची शक्‍यता असल्याने सुरक्षा व सुविधांची महापालिका व सरकारने सर्वस्वी काळजी घेतली आहे. मुंबईत डबेवाल्यांनी या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने उद्याची डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिक, बुलडाणा, अकोला, बीड, परभणी, लातूर व उस्मानाबादहून सर्वाधिक मराठे मुंबईत दाखल झाले आहेत. माथाडी कामगारांची साठ हजारांची फौज सकाळी मोर्चाकडे एकीने दाखल होत आहे. मुंबईतल्या तेरणा, वसंतराव साठे महाविद्यालय, माथाडी कामगार भवन, एपीएमसी मार्केट येथे मोर्चेकऱ्यांसाठी सोय करण्यात आली आहे. 

राजकीय नेत्यांचा सहभाग 
मोर्चाच्या आचारसंहितेप्रमाणे राजकीय नेत्यांचा मोर्चात सहभाग असेल; मात्र मोर्चाच्या अग्रभागी नसेल. विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने सर्वपक्षीय आमदार मुंबईतच आहेत. त्यामुळे या अखेरच्या मोर्चात सर्वपक्षीय राजकीय नेते सहभागी होतील, असे मानले जाते. या मोर्चाला उद्देशून पाच युवतींची भाषणे आझाद मैदानावर होतील. त्यानंतर या मुली शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी विधानभवनात जातील. 

राणे होणार दूत 
सर्वपक्षीय मराठा आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडून मागण्यांचे उत्तर घेऊन मोर्चासमोर जाहीर करतील. माजी मुख्यमंत्री नारायण राणे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. असा निर्णय मराठा मोर्चाचे सर्व आयोजक आणि मराठा संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठक झाला. शिवाजी मंदिरात झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. 

पालिकेची वैद्यकीय पथके 
मुंबई महापालिका मराठा मोर्चासाठी फिरती स्वच्छतागृहे, पाण्याचे टॅंकर आणि मोफत आरोग्य सुविधा पुरवणार आहे. पालिकेच्या 110 डॉक्‍टरांची पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. टोविंग व्हॅनचीही सोय करण्यात आली आहे.

फिरती स्वच्छतागृहे - माटुंगा, प्रतीक्षानगर नाला दोन, माटुंगा, जे. के. केमिकल नाला, बीपीटी- सिमेंट यार्ड, भायखळा ई. एस. पाटनावाला मार्ग, ह्युम हायस्कूल- एटीएस कार्यालय, हज हाऊस, आझाद मैदान 

पाण्याचे टॅंकर - वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, सायन, बीपीटी, सिमेंट यार्ड, राणी बाग, आझाद मैदान 

वैद्यकीय पथके - सुमन नगर जंक्‍शन (20 डॉक्‍टर), राणी बाग (20 डॉक्‍टर), जे. जे. उड्डाणपुलाजवळ (20 डॉक्‍टर), सीएसटी रेल्वेस्थानक (20 डॉक्‍टर), आझाद मैदान (20 डॉक्‍टर), बीपीटी सिमेंट यार्ड 10 डॉक्‍टर (5 महिला आणि 5 पुरुष डॉक्‍टर).

मराठा आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार 
सर्वपक्षीय मराठा आमदारांचे शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेईल. हे शिष्टमंडळ त्यांच्यापुढे मागण्या सादर करील आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन मोर्चासमोर जाहीर करतील. माजी मुख्यमंत्री नारायण राणे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील, असा निर्णय मराठा मोर्चाचे सर्व आयोजक आणि मराठा संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिवाजी मंदिरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नवी मुंबईतील पार्किंग 
- खांदेश्‍वर - मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून अहमदनगरमार्गे येणाऱ्यांना खांदेश्‍वर येथे पार्किंग. येथून लोकलने मुंबईला जाता येईल. 
- कामोठे - औरंगाबाद येथून येणाऱ्या वाहनांसाठी कामोठे येथे वाहनतळ. 
- खारघर - पुणे, सोलापूर येथून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून येणाऱ्यांसाठी खारघर येथील सेंट्रल पार्क येथे पार्किंग. 
- सीवूड्‌स - रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील वाहनांसाठी सीवूड्‌समार्गे पाम बीच मार्गावरील तांडेल मैदानात पार्किंग. 
- सानपाडा - बीडहून येणाऱ्यांसाठी सानपाडा येथील दत्तमंदिराशेजारील भूखंडांवर वाहनतळ. 
- नेरूळ - उस्मानाबाद आणि लातूर येथून येणाऱ्यांसाठी नेरूळ येथील तेरणा कॉम्प्लेक्‍सच्या आवारात पार्किंग. 
- एपीएमसी - सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून येणाऱ्यांसाठी एपीएमसी मार्केट संकुलातील कांदा-बटाटा मार्केटमध्ये पार्किंग.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले मोर्चात सहभागी

'एक मराठा लाख मराठा' म्हणत मुस्लिम बांधवांचा पाठिंबा

मुंबईचे रस्ते झाले भगवे

मोर्चासाठी बारामती ते मुंबई सायकल प्रवास

मराठा मोर्चात लहानग्यांची हजेरी

मराठा क्रांती मोर्चासाठी सीएसटी स्टेशनवर गर्दी

सेल्फी पॉईंटवर मराठा बांधव एकत्र

कोल्हापूरवासीय मोर्चात सहभागी

आझाद मैदानावर मोर्चाआधी घोषणाबाजी

मराठा मोर्चेकरी हातावर टॅटू काढताना

Web Title: marathi news maratha kranti morcha marathainmumbai