मराठी अवमानाच्या मुद्यावर शिवसेना शांत कशी - तटकरे 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई - मराठी भाषा गौरव दिनाच्या आदल्या दिवशी मराठी भाषेचा अपमान झाला आहे, अशा शब्दांत सरकारवर आज अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. त्याचबरोबर मराठी भाषेचा अपमान राज्य सरकारकडून होत असताना, शिवसेना शांत कशी, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावत शिवसेनेचीही कोंडी केली. 

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अनुवादाच्या मुद्यावर विरोधकांनी सभात्याग केला होता. त्याचे पडसाद विधान परिषदेचे सभागृह सुरू होताच उमटले. राज्यपालांच्या अभिभाषणात मराठी अनुवाद ऐकू न आल्याचा मुद्‌दा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित करीत मराठी भाषा गौरव दिनाच्या आदल्या दिवशीच मराठी भाषेचा अपमान झाला असल्याची खरमरीत त्यांनी केली. 

कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही अभिभाषणाच्यावेळी घडलेली घटना निषेधार्ह असून, सांस्कृतिक आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी जाऊन भाषणाचा अनुवाद वाचणे हा राज्यपालांचा अपमान आहे, असा आरोप केला. तर, मराठी भाषेसाठी लढणारे शिवसेनेचे नेते या वेळी गप्प कसे, असा प्रश्न उपस्थित करीत सुनील तटकरे यांनी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषेचा अपमान करण्याची भूमिका सरकारने जाणीवपूर्वक घेतली, असा आरोपही त्यांनी केला. शेकापचे जयंत पाटील यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान, राज्य सरकारकडून याबाबत सारवासारव करताना परिषदेचे सभागृह नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, की अधिवेशन काळात विधानभवनात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीची योजना आणि जबाबदारी विधिमंडळ सचिवालयाची असते. मात्र, आज घडलेली घटना निषेधार्ह आहे. त्यांनी या प्रकाराबद्दल सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले.

Web Title: marathi news marathi shivsena sunil tatkare