सागरी किनारे, जलाशयांवर यापुढे वॉटर पोर्ट : गडकरी 

सागरी किनारे, जलाशयांवर यापुढे वॉटर पोर्ट : गडकरी 

मुंबई : देशात 7500 किलोमीटरचा सागरी किनारा, 111 नद्या, तलाव, जलाशय मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचे रूपांतर वॉटर पोर्टमध्ये करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (ता. 9) येथे दिली. हवाई वाहतुकीसाठी सागरी मार्गाचा पर्याय अद्याप विचारात नाही; मात्र मुंबईतील विमानतळांची क्षमता संपलेली असताना सी-प्लेन सेवा उत्तम पर्याय ठरेल, असा विश्‍वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला. 

नागपूर आणि गुवाहाटी येथे यशस्वी चाचणी घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुंबईतील गिरगाव चौपाटीवर 14 आसनी सागरी विमानाची (सी-प्लेन) शनिवारी (ता. 9) यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर गडकरी बोलत होते. सी-प्लेनसाठी केवळ 300 मीटर धावपट्टीची गरज भासते. त्यामुळे तांत्रिक बाबी सोईच्या आहेत. या सेवेसाठी जेट्टीची गरज असून, ती कमी वेळात बांधता येऊ शकते, असेही गडकरी यांनी सांगितले. 

गडकरी म्हणाले, सागरी विमानामुळे प्रादेशिक शहर जोडणीला हातभार लागणार आहे. भविष्यात उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, पूर्वाचलातील काही प्रदेश, अंदमान, लक्षद्वीप आणि इतर समुद्रकिनारी भागात विमानसेवा सुरू केली जाईल. जपानची सेतेऊची कंपनी अशी विमाने पुरवते. या कंपनीच्या सहकार्याने स्पाईसजेट देशातील जलवाहतूक पर्यायांची तपासणी करत आहे. ही जलवाहतूक सध्या कॅनडा, अमेरिका आणि युरोपात सुरू आहे. तेथील नियमांचा अभ्यास करून भारतात तीन महिन्यांत तशी नियमावली तयार केली जाईल. ही वाहतूक नेमकी कुठल्या मंत्रालयांतर्गत ठेवायची, याचाही अभ्यास केंद्र सरकार करत आहे. देशातील सर्व नद्या, धरण क्षेत्र, समुद्री क्षेत्र, तलाव यांचा उपयोग करण्याचा सरकारचा विचार आहे. राजस्थानमध्ये जोधपूर, उदयपूर, दिल्ली ते ताजमहल, मुंबई ते शिर्डीपर्यंत सी-प्लेन सेवा सुरू करण्याचा मानस आहे. या प्रकल्पात गुंतवणुकदारांनी पुढे यावे, असे आवाहनही या वेळी गडकरी यांनी केले. 

सी-प्लेनसारखे प्रकल्प उड्डाण योजनेसाठी फायदेशीर ठरतील. हवाई वाहतूक क्षेत्र रोजगार देणारे असून सी-प्लेनच्या माध्यमातून पर्यटनातील रोजगार वाढण्यास मदत होईल, असा विश्‍वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केला. सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या मार्गाचा अभ्यास करण्यात येत आहे. या सेवेसाठी सुटसुटीत नियमावली बनवली जाईल. सर्वसामान्यांना भाडे परवडेल अशीच ही सेवा असून वर्षभरात ती सुरू करण्याचा मानस स्पाईसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी व्यक्त केला. 

धुक्‍यामुळे अडथळा 
सी-प्लेनच्या उड्डाण चाचणीच्या वेळेआधीच 11.45 वाजता गडकरी गिरगाव चौपाटीवर हजर झाले; मात्र मुंबईत शनिवारी पसरलेल्या धुक्‍यामुळे सी-प्लेनच्या उड्डाणाला तब्बल दोन तास उशीर झाला. कार्यक्रमानंतर विमानाच्या उड्डाणास विलंब लागल्याने गडकरींसह सारेच अडीच तास बोटीत ताटकळत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com