सैनिकांनो, बंदूका मोडा; शिवसेनेची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

शिवसेनेची भूमिका.. 

  • आर्थिक विषमता हेच जातीयवादाचे कारण आहे. ही विषमता पंतप्रधान कशी संपविणार? 
  • गोरक्षणाच्या मुद्यावर हिंदू समाजातील काही घटक हिंसक व धर्मांध झाले आहेत. त्यांना फक्त इशारे देऊन चालणार नाही. 
  • लोकमान्य टिळकांचे फोटो गणेशोत्सवातून हटविण्याचे प्रकार जातीय भावनेतून सुरू झाले असतील, तर ही श्रद्धा नसून विकृतीच आहे. राज्यातील मोदी यांच्या शिलेदारांनी ती मोडून काढली पाहिजे. 
  • नोटाबंदी आणि जीएसटी लागू करताना जो कठोरपणा दाखविला, तसा 'वंदे मातरम'च्या बाबतीत का दाखविला जात नाही?

मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून खिल्ली उडविण्यात आली आहे. 'काश्‍मीरमधील हिंसाचार आटोक्‍यात आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 'गांधी विचार' लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय देशही नि:शब्द झाला असेल' अशा शब्दांत 'सामना'ने या भाषणावर भाष्य केले आहे. 

'ना गोली से, ना गाली से.. समस्या का समाधान होगा काश्‍मिरी लोगों को गले लगाने से' असा विचार पंतप्रधान मोदी यांनी मांडला होता. त्यावर शिवसेनेने अग्रलेखातून टीका केली आहे. 'काश्‍मीरमधील 370 कलम हटवून टाका. म्हणजे देशभरातील लोकांच्या झुंडी काश्‍मीरमध्ये जातील आणि तेथील लोकांच्या गळाभेटी घेतील. सैनिकांनो, बंदूक मोडा आणि काश्‍मिरींना मिठ्या मारा' अशा शब्दांत शिवसेनेने मोदी यांच्या भाषणाचे 'स्वागत' केले. 

'पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात नेहमीचे गुद्दे गायब आणि फक्त मुद्देच मुद्दे असे स्वरूप होते' अशी टीका शिवसेनेने केली आहे. 'देशात हिंसाचार सुरूच आहे व तो श्रद्धा आणि आस्थेच्या नावावर सुरू असेल, तर मुसलमानच काय, हिंदूंनाही असुरक्षित वाटू लागेल. मुसलमानांची धर्मांधता संपवताना इतर अल्पसंख्याक समाजांतील धर्मांधतेचा सैतानही उसळून येणार नाही, हे पाहावे लागेल' असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.

    Web Title: marathi news marathi websites Mumbai News Shiv Sena Saamana PM Narendra Modi