मिलिंद एकबोटेंची तीन तास चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

शिक्रापूर - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील दंगलप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मिलिंद एकबोटे यांची शिक्रापूर पोलिसांनी आज तब्बल तीन तास कसून चौकशी केली. चौकशीला एकबोटे यांनी संपूर्ण सहकार्य केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिली. 

शिक्रापूर - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील दंगलप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मिलिंद एकबोटे यांची शिक्रापूर पोलिसांनी आज तब्बल तीन तास कसून चौकशी केली. चौकशीला एकबोटे यांनी संपूर्ण सहकार्य केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिली. 

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करताना चुकीचे आरोप लावल्याचा दावा करत जामिनासाठी एकबोटे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांना 14 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्या वेळी पोलिसांच्या तपासाला सहकार्य करण्याची सूचनाही त्यांना करण्यात आली होती. तसेच, मिलिंद एकबोटे यांची चौकशी करून 14 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. त्यानुसार एकबोटे आज दुपारी एकच्या सुमारास शिक्रापूर पोलिस ठाण्यात वकील, काही नातेवाईक व मोजक्‍या कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. पखाले यांच्यापुढे सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर एकबोटे निघून गेले. 

डॉ. पखाले म्हणाले, ""सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही एकबोटे यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनीही चौकशीला सहकार्य केले. आम्हाला जेवढी माहिती हवी होती, तेवढी आजच्या चौकशीतून मिळाली आहे. या शिवाय एकबोटे यांचा कोरेगाव भीमा दंगलप्रकरणातील सहभागाचा अहवाल 14 मार्चपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सादर करायचा आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा तपासासाठी बोलावले जाऊ शकते.'' 

"सध्या मी जात्यात आहे, बाकीचे सुपात, त्यामुळे थोडं थांबा, योग्य वेळी बोलेन' 
-मिलिंद एकबोटे 

"एकबोटेंच्या अटकेवर आम्ही ठाम' 
मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याचा हक्क आम्हाला अबाधित ठेवायचा आहे. न्यायप्रक्रियेत आणि सरकारी बाजू भक्कम होण्याच्या दृष्टीने आम्हाला फक्त ते चौकशीसाठीच नव्हे; तर पुरावा म्हणून काही गोष्टी त्यांच्या चौकशीतून आम्हाला हव्या आहेत. ते चौकशीला यायला तयार आहेत. आम्ही त्यांना बोलावत नव्हतो, असे जे काही बाहेर बोलले गेले, ते योग्य नव्हते. मुळात आम्ही अजूनही त्यांच्या अटकेबाबत ठाम आहोत, अशी भूमिका डॉ. संदीप पखाले यांनी मांडली. 

Web Title: marathi news milind ekbote koregaon bhima Riots