संघाला दोष देता, तुमची औकात काय?: चंद्रकांत पाटील

सोमवार, 5 मार्च 2018

या सर्व गोंधळात सभापतींनी परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर आलेल्या पीठासिन अधिकाऱ्यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले. या सर्व प्रकारानंतर उद्या सर्वांनी ऐकायची तयारी ठेवा मी बोलणार आहे अशा इशाराही चंद्रकांत दादा यांनी दिला. 

मुंबई : आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरील निलंबन मागे घेण्याच्या प्रस्तावाला सहमती कोणत्या विचारधारेने दिली असा सवाल आमदार कपिल पाटील यांनी परिषदेत उपस्थित करताच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पारा चढला. आक्रमक आवाजात ते म्हणाले, विचारधारेवर बोलाल तर याद राखा, आम्ही ऐकून घेणार नाही, संघ आमचा आई बाप आहे. अशा शब्दात त्यांनी दादागिरीच सुरू केली. चंद्रकांत दादांच्या या आक्रमकपणाच्या विरोधात विरोधकही उभे राहिल्यानंतर मला शरद पवारांवर बोलायला लावू नका असा दमही त्यांनी विरोधकांना भरला. 

जवानांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आमदार प्रशांत परिचारक यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र निलंबन कायम ठेवण्याच्या संदर्भात बोलत असताना आमदार कपिल पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात केली. प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव कोणत्या विचार धारेतून आला असा सवाल उपस्थित करताच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पारा चढला. 

विचारधारेवर बोलाल तर याद राखा, संघ आमचा आई बाप आहे. अशी आक्रमक भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडण्यास सुरूवात केली. त्यावर विरोधकांनीही चंद्रकांत दादा ही भूमिका बरी नव्हे असा सूर आवळला. त्यामुळे चंद्रकांत दादांच पारा आणखीच चढला. त्यांनी चक्क राष्ट्रवादीलाच आव्हान दिले की शरद पवारांवर बोलू का मी असा सज्जड दमही त्यांनी विरोधकांना दिला. आक्रमक झालेल्या चंद्रकांतदादांची समजूत घालण्याचा प्रयत्न संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट करीत होते पण दादांचा पारा एवढा चढला होता की ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच दिसत नव्हते. 

या सर्व गोंधळात सभापतींनी परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर आलेल्या पीठासिन अधिकाऱ्यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले. या सर्व प्रकारानंतर उद्या सर्वांनी ऐकायची तयारी ठेवा मी बोलणार आहे अशा इशाराही चंद्रकांत दादा यांनी दिला. 

Web Title: Marathi news mumbai news Chandrakant Patil RSS vidhan parishad