शिवसेनेच्या भीतीने कर्जमाफी दिली नाही - चंद्रकांतदादा पाटील

sarkarnama.in
मंगळवार, 13 जून 2017

शिवसेनेला घाबरून अथवा त्यांनी भीती दाखवली म्हणून सरकारने कर्जमाफी दिली नाही, सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांना न्याय देण्याची होती म्हणूनच आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.

मुंबई : शिवसेनेला घाबरून अथवा त्यांनी भीती दाखवली म्हणून सरकारने कर्जमाफी दिली नाही, सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांना न्याय देण्याची होती म्हणूनच आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. शिवसेनेने सरकारने आपल्याला घाबरूनच कर्जमाफी घेण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा काल केला होता तो दावा पाटील यांनी खोडून काढला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पाटील यांनी शिवसेनेच्या भीतीला घाबरत नसल्याचेही स्पष्ट केले, ते म्हणाले, "सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही शेतकऱ्याच्या भावना आणि त्यांचे म्हणणेही विचारात घेणार आहोत. तसेच विरोधी पक्ष नेत्यांची समिती बनवणार असून ही समिती कर्जमाफीसाठीचे निकष ठरवेल त्या निकषाप्रमाणे कर्जमाफी दिली जाणार आहे, त्यातही एखाद्या शेतकऱ्यांनी जर पीककर्ज घेऊन एफडी इतर बॅंकांत केली असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही, तरीही सर्वानुमते आणि शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करूनच निकष ठरवले जातील.'

ज्या शेतकऱ्याची जमीन ही 5 एकरपेक्षा कमी आहे त्यांना लगेच कर्जमाफी दिली जात असून त्याचे परिपत्रक संध्याकाळपर्यंत काढले जाणार असल्याचेही पाटील म्हणाले ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही त्यांना आम्ही आवाहन करणार असून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: marathi news mumbai news chandrakantdada patil farmer strike maharashtra news