सिंचन क्षेत्रात भर घालण्यात सरकार अपयशी - धनंजय मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - आघाडी सरकारच्या काळातील 32 लाख हेक्‍टर सिंचन क्षेत्रात भर घालण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असून, गेल्या चार अर्थसंकल्पात सिंचनाची आकडेवारी का जाहीर केली नाही, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. राज्यातील सिंचनप्रगतीबद्दल खुद्द राज्यपालांनीच चिंता व्यक्त केली असून, आता सरकारने सिंचनाची खरीखुरी आकडेवारी जाहीर करावी, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.

विधान परिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना धनंजय मुंडे यांनी सरकारच्या विकासाच्या दाव्याची पोलखोल केली. सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून, सरकारवर दिवाळखोरीची वेळ आली आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांवर खुद्द राज्यपाल महोदयांनी नाराजी व्यक्त केली असून, "आभाळंच फाटलंय, आता कुठं कुठं शिवणार', अशा शब्दांत मुंडे यांनी सरकारची खिल्ली उडवली. सरकार मोठमोठ्या घोषणा करते, विकास योजना जाहीर करते; परंतु त्या सगळ्या मंत्रालयात लावलेल्या जाळीत अडकून पडतात, अशी टीकाही त्यांनी केली.

अर्थसंकल्पात शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा उल्लेख नाही, त्याऐवजी अश्वारूढ पुतळा एवढाच उल्लेख केल्याबाबत मुंडे यांनी आक्षेप घेतला. महाराजांचा पुतळा आधी ठरल्याप्रमाणे जगातला सर्वाधिक उंचीचा असला पाहिजे, महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केलेली खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अवघा 5 टक्के निधी राखून ठेवला आहे. हा अपुरा आहे. कर्जमाफी जाहीर होऊन नऊ महिने झाले तरीही 43 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.

Web Title: marathi news mumbai news irrigation field government dhananjay munde