शेतकऱ्यांना पावसाचा दिलासा 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 ऑगस्ट 2017

मुंबई : गणरायाच्या आगमनासह राज्यात पावसानेही पुन्हा बरसण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. गणेश विसर्जनापर्यंत पावसाची रिपरिप सुरू राहील, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने राज्यातील धरणांचा पाणीसाठा गतवर्षीपेक्षा अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई : गणरायाच्या आगमनासह राज्यात पावसानेही पुन्हा बरसण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. गणेश विसर्जनापर्यंत पावसाची रिपरिप सुरू राहील, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने राज्यातील धरणांचा पाणीसाठा गतवर्षीपेक्षा अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. 

यंदाच्या पावसाने समाधानकारक सुरुवात केली असली, तरी जुलैअखेर आणि ऑगस्टच्या सुरुवातीला दडी मारली होती. त्यामुळे राज्यातील खरिपाची पिके उभी असताना ती करपण्याच्या स्थितीत होती. त्यातच सुरुवातीला पाऊस कमी पडेल, याचा ठोस अंदाज हवामान खात्यालाही नसल्याने बळीराजाची चिंता वाढली होती. पावसाची ही स्थिती असताना राज्यातील धरणांमध्येही महिन्याभरापूर्वी चिंताजनक पाणीसाठा होता. पुणे, नाशिक आणि कोकण वगळता अन्य प्रादेशिक विभागांतील धरणे रिकामीच होती. यंदाच्या तुलनेत गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठाही बऱ्यापैकी होता. मात्र, गेल्या आठवड्यात आणि नंतर गणरायाच्या आगमनासोबत पावसानेही राज्यात दमदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पावसाची रिपरिप सुरूच राहिल्यास गतवर्षीच्या पाणीसाठ्याची बरोबरी दोन-तीन दिवसांत होण्याची शक्‍यता आहे. 

राज्यात मोठे, मध्यम आणि लहान मिळून तीन हजार 247 धरणे आहेत. त्यांत शनिवारपर्यंत (ता. 26) सरासरी 57.03 टक्‍के पाणीसाठा आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाचे सावट सहन करणाऱ्या मराठवाड्यातील परिस्थिती विदर्भापेक्षा समाधानकारक आहे. मराठवाड्यातील धरणांत 34.06 टक्‍के पाणीसाठा असताना अमरावती 22.11, तर नागपूर विभागातील धरणांत 24.94 टक्‍के पाणी आहे. 

राज्यातील धरणांची सद्यस्थिती 

विभाग : धरणे : पाणीसाठा (द.ल.घ.मी.) : टक्‍केवारी : गतवर्षीचा साठा (टक्के) 
अमरावती : 454 : 1717 : 22.11 : 55.87 
नागपूर : 383 : 2114 : 24.94 : 51.31 
मराठवाडा : 956 : 4236 : 34.06 : 28.75 
नाशिक : 555 : 4520 : 63.67 : 61.83 
कोकण : 175 : 3375 : 91.69 : 89.92 
पुणे : 726 : 14774 : 76.78 : 78.08

Web Title: marathi news mumbai news Monsoon in Maharashtra