पीक विमा योजनेसाठी आजही बँका उघड्या राहणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 जुलै 2017

या योजनेत खरीप हंगामात सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2017 पर्यंत अंतिम मुदत आहे. आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. जनसुविधा केंद्र तसेच बँकांमध्ये शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्याची दखल घेऊन रविवारी सुट्टीच्या दिवशीही ग्रामीण व निमशहरी भागांतील बँका उघड्या ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

मुंबई : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी बँकांसमोर लागलेल्या रांगा आणि अनेक ठिकाणी सर्व्हर बंद पडल्याने शेतकऱ्यांची झालेली गैरसोय पाहून या कामासाठी रविवारीही (ता. 30) राज्यातील बँका उघड्या राहणार आहेत. बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांसाठी 'ई-केवायसी'ची अट तात्पुरती बाजूला ठेवून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

या योजनेपासून कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदत वाढवून मागितली आहे. 

या योजनेत खरीप हंगामात सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2017 पर्यंत अंतिम मुदत आहे. आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. जनसुविधा केंद्र तसेच बँकांमध्ये शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्याची दखल घेऊन रविवारी सुट्टीच्या दिवशीही ग्रामीण व निमशहरी भागांतील बँका उघड्या ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. सोमवारी साप्ताहिक सुट्टी असलेल्या बँकांनाही त्या दिवशी कामकाज सुरू ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेने कळवले आहे. 

ऑनलाईन अर्ज भरताना 'ई-केवायसी'मुळे फॉर्म भरण्यास विलंब लागतो. त्यातच काही ठिकाणी इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीची समस्या जाणवल्याने ई-केवायसीची अट तात्पुरती बाजूला ठेवून शेतकऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारावेत यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला मंजुरी देत बँकांमध्ये ई-केवायसीची माहिती घेऊन अर्ज ऑफलाईन जमा करण्यात येत आहेत. या सुविधेमुळे बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होईल व शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जातील.

Web Title: marathi news mumbai news pradhan mantri fasal bima yojana