भागोsss! भागवत आया; राज ठाकरेंची बोचरी टीका

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मोहन भागवत झोपले आहेत आणि त्यांना स्वप्न पडले आहे. या स्वप्नाला थंडीतील एक उबदार स्वप्न असे नाव दिले आहे. भागवत आणि नवसंघिष्ट काठ्या घेऊन उभे आहेत आणि त्यांच्यासमोर संघ विचार, बौद्धिक, चिंतन अशा पुस्तकांचा ढीग आहे.

मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून बोचरी टीका करत भागोsss! भागवत आया! असे पाकिस्तानी लष्कर व अतिरेकी म्हणत असल्याचे व्यंगचित्र रेखाटले आहे.

मोहन भागवत यांनी नुकतेच देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर भारतीय लष्कराला तयार होण्यासाठी 6 ते 7 महिने लागतील. पण, देशाला गरज पडली तर तीन दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सज्ज होतील, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर हा लष्कराचा अपमान असून, त्यांनी माफी मागायला हवी असे म्हटले होते.

आता राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून त्यांच्यावर टीका केली आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी रेखाटले आहे, की मोहन भागवत झोपले आहेत आणि त्यांना स्वप्न पडले आहे. या स्वप्नाला थंडीतील एक उबदार स्वप्न असे नाव दिले आहे. भागवत आणि नवसंघिष्ट काठ्या घेऊन उभे आहेत आणि त्यांच्यासमोर संघ विचार, बौद्धिक, चिंतन अशा पुस्तकांचा ढीग आहे. भागवत पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेक्यांना उद्देशून म्हणत आहेत, क्या है रे इकडे? चलो पलिकडे! दांडुका देखा नही क्या हमारा? एक एक को पुस्तक फेकके मारेगा! समजलं क्या? यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेकी भागोsss! भागवत आया! असे म्हणत पळाल्याचे रेखाटले आहे.

Web Title: Marathi news Mumbai news Raj Thackeray criticize Mohan Bhagwat RSS