रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीला बसवा: उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

उद्धव ठाकरे अग्रलेखात म्हणतात की, शे- पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे. हप्ते न फेडल्याने त्याच्यावर जप्तीचा कारवाई केली जाते मात्र देशातील बनेल उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट केली व ते सगळे दरोडेखोर सरकारीकृपेने ‘सुखरूप’ आहेत. देश सध्या जाहिरातबाजीवर चालला असून प्रसिद्धी आणि जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च केला जात आहे.

मुंबई : बँकांना गंडा घालून परदेशात पळून गेलेल्या निरव मोदी प्रकरणावरून सत्तेतील शिवसेना भाजपात तुंबळ युद्ध सुरू झाले आहे. निरव मोदीला आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर बसवा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना च्या अग्रलेखातून लगावला. खासदार संजय राऊत यांनी तर दोन मोदी परदेशात पळून गेले असून "तिसरा येऊन जाऊन असतो" असा चिमटा आज काढला. यावर खवळलेल्या मुंबई भाजप अध्यक्ष आशिर शेलार यांनी सेनेत शिमगा सुरू झाल्याचा पलटवार केला.

उद्धव ठाकरे अग्रलेखात म्हणतात की, शे- पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे. हप्ते न फेडल्याने त्याच्यावर जप्तीचा कारवाई केली जाते मात्र देशातील बनेल उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट केली व ते सगळे दरोडेखोर सरकारीकृपेने ‘सुखरूप’ आहेत. देश सध्या जाहिरातबाजीवर चालला असून प्रसिद्धी आणि जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च केला जात आहे. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुरामन राजन यांनी समोर आणल्या तेव्हा त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा, म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल असा टोला  उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला लगावला. 

भारतात विकासकामांसाठी पैशाची कमतरता नाही; पण बादलीलाच जर छिद्र असेल तर पाणी भरणार कसे, असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेस 11 हजार कोटींचा चुना लावला. चुना लावून हे महाशय सहकुटुंब पळून गेले. नीरव मोदी याने जानेवारीतच देश सोडल्याचे उघड झाले, पण गेल्याच आठवड्य़ात हे महाशय पंतप्रधान मोदींबरोबर ‘दावोस’ येथे मिरवत होते व मोदी यांच्यासोबतची त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. नीरव मोदी हा भारतीय जनता पक्षाचा ‘हमसफर’ होता व निवडणुकांसाठी पैसा जमा करण्यात हे महाशय आघाडीवर होते. अर्थात इतका मोठा घोटाळा नीरवने भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने केला व त्याने बँकांची जी लूट केली त्यातला वाटा भाजपच्या खजिन्यात गेला असा आरोप आम्ही करणार नाही! पण भाजपची श्रीमंती वाढवण्यात व निवडणुका जिंकण्यासाठी वगैरे पैशांचे डोंगर उभे करण्यात असे अनेक नीरव मोदी झटत आहेत. अशा शब्दात ठाकरे यांनी सरकारचे वाभाडे काढले. 

खासदार संजय राऊत यांनी ललित आणि निरव मोदी हा धागा पकडून जोरदार ट्विट केले, दोन मोदी परदेशात पळून गेले असून "तिसरा येऊन जाऊन असतो", असे म्हणून भाजपला खिजवले. यावर संतापलेले आशिष शेलार यांनी ट्विट केले की, मोदी या शब्दांचे यमक जुळवून टुकार काव्य प्रभादेवीच्या गल्लीत बसून काहींना सुचले, तेव्हाच कळाले आता शिमगा जवळ आलाय, तसा वर्षभरच यांचा शिंगाच असतो म्हणा, उगाच यमकासाठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय? तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झालं.

Web Title: Marathi news Mumbai news Udddhav Thackeray statement on Nirav Modi