नरकयातनेतून सुटलेल्या 'तिचा' जिद्दीचा लढा! 

मंगेश सौंदाळकर 
गुरुवार, 8 मार्च 2018

परी आता नव्या आयुष्याची उभारी घेत आहे. एक मुलगी म्हणून जन्म घेतल्याची तिला या समाजात मोजावी लागलेली किंमत आपल्या सगळ्या सुशिक्षितांसमोर खऱ्या संघर्षाची कहानी आहे.

मुंबई - समाज कितीही बदलला तरी आजही अनेक ठिकाणी मुलींची हेटाळणी केली जाते. अनेक वर्षे नरकयातना भोगत असलेली परीही (नाव बदलेले) त्यातलीच. पण तिच्या जिद्दीच्या लढा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. भूतकाळ विसरून परी आता नव्या आयुष्याची उभारी घेत आहे. जिद्दीच्या जोरावर ती स्वत:चं मिरा रोड येथे ब्युटी पार्लर सुरू करणार आहे. ब्युटी पार्लरच्या कमाईतून ती स्वत:चे घर विकत घेणार आहे. 18 वर्षांनी भेट झालेल्या कुटुंबियांसोबत तिला आयुष्याची नवी सुरुवात करायची आहे. 

परी ही मुळची बिहारची रहिवासी आहे. शिक्षणाच्या नावाखाली सहा वर्षांची असतानाच परीला घराशेजारी राहणाऱ्या एकाने मुंबईत आणले. त्यानंतर मुंबईत एका कुटुंबाला तिला 50 हजारांत विकले. त्यावेळी तिला घरातील सर्व कामे करायला लागायची. काम व्यवस्थित न झाल्यास बऱ्याचदा मारहाणही झाली होती. हा त्रास तिने तीन वर्षे सोसला. परीला नवव्या वर्षी कामाठीपुरातील दलालाला विकण्यात आले. दहाव्या वर्षी डान्सबारमध्ये कमी कपड्यात तिला नृत्य करण्यास भाग पाडले जात होते. दिवसाला किमान 10 ग्राहकांना आकर्षित न केल्यास वेळप्रसंगी सिगारेटचे चटके व बेदम मारहाण केली जात असे. या दरम्यान परीची एका व्यक्तीशी भेट झाली. त्याने परीची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून काही मुलींना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान परी एका कपाटात लपली होती. या वेळी परीने आरडाओरड केल्यावर पोलिस त्या कपाटाजवळ गेले. तेथून परीची पोलिसांनी सुटका केली. 

18 वर्षांनंतर परीच्या कुटुंबाचा शोध -
चेंबूरच्या बालगृहात परीला पुनर्वसनासाठी पाठविण्यात आले. तेथे केलेल्या समुपदेशनामुळे परीचा आत्मविश्‍वास वाढला. त्यामुळे तिला लिहिता-वाचता आले. यासाठी 'पूर्णता' या सामाजिक संस्थेची तिला मदत झाली. जावेद हबीब यांचा लोरिअल ब्युटी कोर्सचा तिने चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिरा रोड येथील ब्युटी पार्लरमध्ये तीन महिने तिने काम केले. आता परीला मिरा रोड येथे स्वत:चे ब्युटी पार्लर सुरू करायचे आहे. 'पूर्णता' संस्थेच्या आबुभैय्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे गेल्या डिसेंबरमध्ये 18 वर्षांनंतर परीच्या कुटुंबाचा शोध लागला आहे.

Web Title: marathi news mumbai women day special fight against