कुरिअरमधील स्फोट दहशतवादी कृत्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नगर - मारुती कुरिअर कंपनीच्या येथील माळीवाडा परिसरातील कार्यालयामध्ये मंगळवारी रात्री झालेला स्फोट क्रूड बॉंबचा (देशी बनावटीचा) असल्याचे आणि हे पार्सल पुण्यात सरहद संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार यांना पाठविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुरिअरसाठी पार्सल आणून देणाऱ्या व्यक्तीचे रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्धीला दिले. विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी आज सकाळी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

मारुती कुरिअरमध्ये काल (मंगळवारी) दुपारी अनोळखी व्यक्तीने हे पार्सल एका मुस्लिम महिलेच्या नावाने आणून दिले होते. मात्र, कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्याने ते कोणी पडताळून पाहिले नाही. दिवसभर आलेल्या पार्सलची विभागणी "मारुती'चे संदीप भुजबळ व संजय क्षीरसागर या कर्मचाऱ्यांनी रात्री पावणेदहा वाजता सुरू केली. तेव्हा भुजबळ यांच्या हातून ते पार्सल खाली पडले. त्यात वेगळा आवाज येऊन त्यातील वस्तू बाहेर आली. त्यांनी ते उघडले असता, त्यात एक चिठ्ठी आणि रेडिओसारखे छोटे उपकरण आढळले.

नजमा शेख नामक व्यक्तीने हिंदीत लिहिलेली ही चिठ्ठी भुजबळ यांनी वाचली. तीमध्ये "संजय सर... तुमच्यामुळे मी आयुष्यात उभी राहिले. तुम्ही मला सरहद कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. मी आज जीवनात उभी असेल, तर केवळ तुमच्यामुळे आहे. सध्या मी नगरमध्ये आहे. त्यामुळे आपली भेट होऊ शकत नाही. या उपकरणात माझा आवाज रेकॉर्डिंग केलेला आहे. तो तुम्ही ऐकावा, ही विनंती.

आपली - नजमा शेख' असा मजकूर लिहिलेला होता. या वस्तूच्या मागील बाजूस "यामध्ये बॅटरी नाही. कृपया चार्जिंग लावून ऐकावे,' असे लिहिले होते. त्यामुळे क्षीरसागर यांनी तो "रेडिओ' सुरू करण्यासाठी त्याचा प्लग इलेक्‍ट्रिक बोर्डामध्ये लावताच स्फोट झाला. त्यात भुजबळ आणि क्षीरसागर दोघेही जखमी झाले.

Web Title: marathi news nagar blast courier office suspected sketch