नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान

टीम ई सकाळ
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

बृहन्मुंबई, नागपूर, कोल्हापूर व पुण्यातील 5 रिक्त पदांसाठीदेखील मतदान

मुंबई : नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका; तसेच बृहन्मुंबई, पुणे व नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 12 ऑक्टोबर रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
 
नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची मुदत 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 50 हजार 439 असून, मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 96 हजार 580 इतकी आहे. एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 41 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2; तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 22 जागा राखीव आहेत, असे सहारिया यांनी सांगितले. 
 
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ‘116’, पुण्यातील  प्रभाग क्र. ‘21अ’ नागपूरमधील प्रभाग क्र. ‘35-अ’ आणि कोल्हापूरमधील प्रभाग क्र. ‘11’ व ‘77’ च्या रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील मतदान होत आहे. या सर्व ठिकाणी 16 सप्टेंबर 2017 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरूवात होईल. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नांदेड- वाघाळा महानगरपालिका आणि पोट निवडणूक होत असलेल्या अन्य महानगरपालिकांच्या संबंधित प्रभागांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ती संपुष्टात येईल. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल, असेही सहारिया यांनी सांगितले.
 
निवडणूक कार्यक्रम
  • नामनिर्देशनपत्रे दाखल करणे- 16 ते 23 सप्टेंबर 2017
  • नामनिर्देशपत्रांची छाननी-  25 सप्टेंबर
  • उमेदवारी मागे घेणे-  27 सप्टेंबर 
  • निवडणूक चिन्ह वाटप-  28 सप्टेंबर 
  • मतदान- 11 ऑक्टोबर
  • मतमोजणी- 12 ऑक्टोबर
  • निकालांची राजपत्रात प्रसिद्धी- 13 आक्टोबर 
Web Title: marathi news nanded corporation elections, by-elections