'फसवणूक करणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई - फक्त लोकांच्या भावनेला हात घालायचा, प्रत्यक्षात काही करायचे नाही, लोकांची फसवणूक करायची. यातून लोकांना वाचवायचे असेल तर हल्लाबोल थांबवायचा नाही, आता यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय थांबायचे नाही, असा निर्धार माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता. 28) व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथील आझाद मैदानात आयोजित केलेल्या हल्लाबोल यात्रेत ते बोलत होते. 

या वेळी पवार म्हणाले, ""यंदा देशात धान्य उत्पादनासाठी कार्यक्रम राबवला जात आहे. मात्र, रेशनिंग दुकानात गहू, तांदूळ देण्याऐवजी मका दिला जात आहे. अनेक देशांत मका जनावरांसाठी दिला जातो. या सरकारने सामान्य जनतेच्या आरोग्याला धक्का लावण्यास सुरवात केली आहे. उत्पादन जास्त होऊन ही स्थिती आहे. "ना खाऊंगा ना खाणे दूँगा' असे हा गडी सांगत होता. पण याच मुंबई शहरातून नीरव मोदी 11 हजार कोटी रुपये लुटून पळाला. सरकारने जी उद्योगविषयक धोरणे बदलली आहेत, त्यामुळे देशात लहान उद्योग बंद पडणार आहेत आणि बेरोजगारी वाढणार आहे. एखादा उद्योजक किंवा तरुण संकटात आला तर त्याचे पुनर्वसन करायचे धोरण, कायदे या सरकारने रद्द केले आहेत. महागाई शिगेला पोचली आहे, सुरू असलेले कारखाने बंद होत आहेत, रोजगार कमी होत आहेत. नवीन रोजगार मिळत नाहीत. समाजातील खालच्या वर्गावर अन्याय होत आहे. "अच्छे दिन'ची घोषणा केली होती; मात्र आता लोक म्हणत आहेत, आम्हाला आमचे जुने दिवस द्या आणि आमची सुटका करा. पण हे काही सुटका करणार नाहीत, त्यामुळे आता आपणच त्यांच्याकडून सुटका करून घ्यायची आहे.'' 

स्मारकाबाबत सरकार उदासीन 
राज्यात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अजून झालेले नाही. आंबेडकर स्मारकाबाबतही काही केले नाही. फक्त लोकांच्या भावनेला हात घालायचा, प्रत्यक्षात काही करायचे नाही, लोकांची फसवणूक करायची. यातून लोकांना वाचवायचे असेल तर हल्लाबोल थांबवायचा नाही, आता यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय थांबायचे नाही, असा निर्धारही पवार यांनी या वेळी बोलून दाखवला. हल्लाबोल यात्रा पूर्ण राज्यात फिरली, आता पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातील हल्लाबोल बाकी आहे. येथील लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी अधिवेशन संपले की त्या भागात हल्लाबोल यात्रा काढली जाईल, असेही पवार या वेळी म्हणाले. 

Web Title: marathi news NCP sharad pawar politics