नोंदणीकृत परिचारिकांची शोधाशोध

यशपाल सोनकांबळे
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे - डॉक्‍टरांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांची नोंदणी तपासण्याचा धडाका महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केला आहे. तशी पत्रेही खासगी रुग्णालयांना पाठविण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ उडाला आहे. रुग्णालयांकडून आता महाराष्ट्र परिचारिका परिषदेकडे नोंदणी असलेल्या परिचारिकांची शोधाशोध सुरू झाली आहे.

पुणे - डॉक्‍टरांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांची नोंदणी तपासण्याचा धडाका महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केला आहे. तशी पत्रेही खासगी रुग्णालयांना पाठविण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ उडाला आहे. रुग्णालयांकडून आता महाराष्ट्र परिचारिका परिषदेकडे नोंदणी असलेल्या परिचारिकांची शोधाशोध सुरू झाली आहे.

राज्य सरकारने राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांतील परिचारिकांच्या नोंदणीची माहिती देणे बंधनकारक केले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालये, दवाखाने व प्रसूतिगृहांना पत्रे पाठविली आहेत. शहरात अंदाजे सहाशे ते सातशे खासगी रुग्णालये आहेत. कॉर्पोरेट मोठी, मध्यम व लहान रुग्णालयांमध्ये हजारोंच्या संख्येने परिचारिका कार्यरत आहेत. त्यांची नोंदणी महाराष्ट्र परिचारिका परिषद (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल-एमएनसी) यांच्याकडे आहे की नाही, याची माहिती देणे बंधनकारक केल्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

नागरिकांची गैरसोय होणार
इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए)चे अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘राज्य सरकारचा निर्णय चुकीचा नाही; परंतु तो तातडीने लागू केल्यास रुग्णालये, परिचारिकांसोबतच नागरिकांची गैरसोय होईल. कारण सर्व खासगी रुग्णालयांमध्ये नोंदणीकृत परिचारिका असतीलच असे नाही. हा निर्णय लागू करायचा म्हटले तर नोंदणीकृत परिचारिका उपलब्ध होणार नाहीत. नोंदणीकृत परिचारिकांच्या नेमणुका केल्या गेल्या तर उपचारांचे दर वाढतील. परिणामी नागरिकांची गैरसोय होईल.’’

अट शिथिल करण्यासाठी प्रयत्न
दोन दिवसांपूर्वीच ‘आयएमए’च्या शिष्टमंडळाची सहायक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्याशी बैठक पार पडली. यात ‘राज्य सरकारने या अटीमध्ये शिथिलता द्यावी’ अशी विनंती करणारे पत्र महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारला पाठविले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. प्राधान्याने येणाऱ्या परिचारिकांच्या नेमणुका केल्या जाव्यात आणि उपलब्ध परिचारिकांमध्ये कामकाज करण्याची मुभा द्यावी, असेही त्यात सुचविले आहे.

राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या निर्णयानुसार, पुणे महापालिकेने पत्र काढले आहे. त्यानुसार शहरातील सर्व रुग्णालयांकडून परिचारिकांच्या नोंदणीची माहिती घेतली जात आहे. त्या आधारावर संबंधित रुग्णालयांच्या परवान्यांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया केली जाईल. 
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका

Web Title: marathi news nurse pune health doctor