परिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - विधान परिषदेतील भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीवरून शिवसेनेने आज पुन्हा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. मात्र परिचारक यांच्या आमदारकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत शिवसेनेच्या सदस्यांनी विधानसभेत सभात्याग केला. 

मुंबई - विधान परिषदेतील भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीवरून शिवसेनेने आज पुन्हा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. मात्र परिचारक यांच्या आमदारकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत शिवसेनेच्या सदस्यांनी विधानसभेत सभात्याग केला. 

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर परिचारक यांना बडतर्फ करण्याची मागणी करत त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. परिचारक यांचे वक्तव्य हे सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करणारे असून, या वक्तव्याबाबत कठोरातील कठोर शिक्षा द्यायला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. या वेळी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन परिचारक यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 

अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय येथे घेता येत नसल्याची बाब शिवसेनेच्या सदस्यांच्या नजरेस आणून दिली. मात्र तरीही शिवसेनेच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका न सोडल्याने अखेर विधानसभेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 

त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर प्रभू यांनी परिचारक यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याबाबतचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष बागडे यांनी याबाबतचा निर्णय विधान परिषदेत घेतला जाईल, असे सांगितले. त्यावर परिचारक यांच्याबाबत सभागृहाच्या भावना तीव्र असून, याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. या प्रश्‍नावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे मत एकच असल्याची भूमिका चव्हाण यांनी मांडली. 

त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ""विधानसभेप्रमाणे विधान परिषदेचे सभागृहही स्वायत्त आहे. तेथे या विषयावर चर्चा करण्यात येत असून, तिथेच याबाबत निर्णय होईल.'' परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य असल्याची बाबही त्यांनी नजरेसमोर आणून दिली. मुख्यमंत्र्यांचे उत्तर संपताच प्रभू यांनी परिचारक यांच्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचा आरोप करत शिवसेनेचे सर्व सदस्य सभात्याग करत असल्याचे जाहीर केले. 

Web Title: marathi news prashant paricharak shivsena maharashtra