आत्मसन्मानाची भावना जागृत करण्यासाठी स्त्रीशक्तीचा जागर आवश्यक : डॉ. पाटील

प्रा. प्रशांत चवरे
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

स्त्रियांचा सन्मान घरात घरात झाला तरच समाजामध्ये सन्मान होईल. अंधश्रध्दा किंवा रुढी परंपरामुळे स्त्रियांना समाजामध्ये कमी लेखले जाते. सामाजिक भावनेने पत्नी झरिनाच्या साथीने बारामती येथे सावली अनाथ आश्रमाची स्थापना केली. या कामामध्ये पत्नी झरिना खान यांचा सिंहाचा वाटा आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पत्नीने केलेल्या काम झाकोळुन जाऊ नये, यासाठी स्वतःच्या नावांमध्ये पत्नीच्या नावाचा समावेश केला आहे.

भिगवण : एकविसाव्या शतकामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये अमूलाग्र बदल होत असताना स्त्रियांच्या स्थितीमध्ये मात्र फारशी सुधारणा होत नाही. दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये स्त्रियांवरील अत्याचाराचे रकानेच्या रकाने भरलेले असतात. हे प्रागतिक समाजाचे लक्षण नाही. समाजातील या वास्तवाचा स्वीकार करुन स्त्रियांनी शैक्षणिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सिध्द होण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांमध्ये आत्मसन्मानाची भावना जागृत करण्यासाठी स्त्री शक्तीचा जागर करण्याची आवश्यकता आहे, असे मत वारणानगर येथील डॉ. प्रिती पाटील यांनी व्यक्त केले.

येथील अखिल भारतीय मराठा महासंघ संचलित छत्रपती शिवराय सावर्जनिक वाचनालयाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना जागर स्त्री शक्तीचा या विषयावर गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महेश खान होते. तर दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, एस.पी. सराफचे संचालक अमर शहाणे उपस्थित होते.

डॉ. पाटील पुढे म्हणाल्या, स्त्रीबाबत असमानता घरामधूनच सुरु होते. सुरवातीस पालकाचा मुलगा व मुलगीमध्ये भेद करुन मुलगी कशी दुय्यम आहे. हे तिच्यावर बिंबविण्याचा प्रयत्न करतात. समाजाचा पन्नास टक्के हिस्सा असलेल्या स्त्रियांच्या प्रगतीशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मुलामुलींमध्ये समानता, मुलींचा सन्मान व त्यांना आत्मबळ या महिला सक्षमीकरणाच्या पायऱ्यांचा अवलंब केला पाहिजे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश खान म्हणाले, स्त्रियांचा सन्मान घरात घरात झाला तरच समाजामध्ये सन्मान होईल. अंधश्रध्दा किंवा रुढी परंपरामुळे स्त्रियांना समाजामध्ये कमी लेखले जाते. सामाजिक भावनेने पत्नी झरिनाच्या साथीने बारामती येथे सावली अनाथ आश्रमाची स्थापना केली. या कामामध्ये पत्नी झरिना खान यांचा सिंहाचा वाटा आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पत्नीने केलेल्या काम झाकोळुन जाऊ नये, यासाठी स्वतःच्या नावांमध्ये पत्नीच्या नावाचा समावेश केला आहे.  

यावेळी प्रा. रामदास झोळ यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस पाटील शुभांगी दादासाहेब जगताप, पोलिस पाटील उर्मिला गायकवाड, राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या सारिका संतोष जाधव वसलोनी संतोष जाधव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल पुजा भोई यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक स्नेहल संदीप काळे यांनी केले सूत्रसंचालन सुचेता साळुंखे यांनी केले तर आभार पांडुरंग वाघ यांनी मानले.

Web Title: Marathi News Pune News Bhigwan News Dr Preeti Patil