"टीस' विद्यापीठ, "एसआयआयएलसी' दरम्यान शैक्षणिक करार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

- "पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऍग्री बिजनेस मॅनेजमेंट' हा एक वर्षाचा विशेष अभ्यासक्रम 
- टीस विद्यापीठाची पदवी मिळविण्याची संधी 
- विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांतर्गत थेट उद्योगांमध्ये कामाची संधी 
- अभ्यासक्रमासाठी नावनोंदणी सुरू 
संपर्क : www.siilc.edu.in / 9146038032 

पुणे : शैक्षणिक क्षेत्रातील ख्यातनाम संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) विद्यापीठ आणि कौशल्य, उद्योजकता प्रशिक्षण आयोजित करणाऱ्या सिमॅसेस इंटरनॅशनल इंटरडिसिप्लिनरी लर्निंग सेंटर (एसआयआयएलसी) यांच्या दरम्यान एक वर्षाच्या "पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट' या पदव्युत्तर विशेष अभ्यासक्रमासाठी खास शैक्षणिक करार करण्यात आला आहे. या करारामुळे उद्योग आणि विद्यार्थ्यांमधील दरी कमी होऊन अभ्यासक्रमाच्या सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांना थेट उद्योगांसोबत काम करण्याचा अनुभव तसेच टीस विद्यापीठाची पदवी मिळविण्याची संधीसुद्धा उपलब्ध होणार आहे. 

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस विद्यापीठ गेल्या 53 वर्षांपासून उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करणारे विद्यापीठ आहे. "सकाळ माध्यम समूह'सुद्धा एसआयआयएलसीच्या माध्यमातून विविध कौशल्य क्षेत्रांतील अभ्यासक्रम आयोजित करत आहे. आतापर्यंत 20 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एसआयआयएलसीच्या माध्यमातून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. कृषी क्षेत्राशी निगडित खते, बी-बियाणे, कीडनाशके, पाटबंधारे, टिश्‍युकल्चर, यंत्रे-अवजारे आदी उद्योगांना कुशल मनुष्यबळ लागते. कौशल्य (स्किल्स) असणाऱ्या विद्यार्थ्यांना या उद्योगांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्याही उपलब्ध आहेत. 

या उद्योगांना लागणारे उमेदवार घडविणारा "ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट' हा खास अभ्यासक्रम असून त्याची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. कृषी वा अन्य कोणत्याही विषयांतील पदवीधर विद्यार्थी ज्यांना कृषी उद्योग किंवा कृषी क्षेत्रात करिअर करायचे आहे ते या अभ्याक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. एक वर्षाच्या या खास अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर दिला जाणार आहे. अभ्यासक्रमादरम्यान उद्योगांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळविणे हे अनिवार्य असल्याने (ऑन द जॉब ट्रेनिंग) विद्यार्थी पहिल्या दिवसापासूनच कृषी उद्योगात काम करण्यासाठी पूर्णपणे तयार होऊ शकतील. 

हा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय पातळीच्या मानकांवर आधारित असून, या अभ्यासक्रमात कृषी व संलग्न विषयांचे 680 तासांचे व्यवसायिक प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचे मुल्यांकन टीस विद्यापीठासोबतच उद्योगातील तज्ज्ञांकडून केले जाणार आहे. या अभ्यासक्रमाचे नोंदणी अर्ज एसआयआयएलसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

 

Web Title: Marathi News Pune News TIS university SILC Education Agreement