ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

पुणे - विनोदांनी रसिकांना खळखळून हसविणारे 'हसरी उठाठेव' फेम ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर (वय 70) यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी (ता.13) सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी (ता. 12) रात्री एक वाजता त्यांचे डोंबिवलीत निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा सौरभ आहे. 

चांदेकर यांचे पार्थिव टिळक स्मारक मंदिर येथे मंगळवारी सकाळी काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी साहित्य, नाट्य आणि एकपात्री क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, एकपात्री कलाकार संतोष चोरडिया, निवेदक सुधीर गाडगीळ, विजय कोटस्थाने, प्रकाश पारखे, मकरंद टिल्लू, वंदन नगरकर, उदय लागू, श्रीराम रानडे, दीपक काळे, मोहन कुलकर्णी, अशोक जाधव आदींतचा त्यात समावेश होता. 

मॉडर्न हायस्कूलमध्ये कलाशिक्षक असणाऱ्या चांदेकर यांनी आर्केस्ट्रामधून कलेच्या दुनियेत पाऊल ठेवले. मिमिक्री कलाकार म्हणून सुरवात करणाऱ्या चांदेकर यांना 'हसरी उठाठेव' या त्यांच्या एकपात्री नाटकाने खरी ओळख मिळवून दिली. त्याचे ऑस्ट्रेलिया, इस्राईलमध्येही दौरे झाले. 'आम्ही दिवटे' हे त्यांचे आत्मकथन प्रकाशित झाले आहे. बंडा जोशी म्हणाले, 'चांदेकर हे अवलिया होते. एकपात्री कलेतून त्यांनी रसिकांच्या मनात एक स्थान निर्माण केले. उत्तम दर्जाच्या कलाकृती त्यांनी रंगभूमीला दिल्या.' मकरंद टिल्लू म्हणाले, 'मॉडर्न हायस्कूलमध्ये ते माझे कलाशिक्षक होत. कलाकार म्हणून ते मोठे होते. त्यांचे एकपात्री कलाकृतीतील योगदान विसरता येणार नाही.'

Web Title: marathi news pune theater actor sadanand chandekar passes away