‘महाआघाडी’चे मनसेला आवतण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला रोखण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या महाआघाडीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सहभागी व्हावे, असा प्रस्ताव उच्चस्तरावर चर्चेत असल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते. 

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला रोखण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या महाआघाडीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सहभागी व्हावे, असा प्रस्ताव उच्चस्तरावर चर्चेत असल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते. 

राज यांची वैयक्‍तिक लोकप्रियता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मते मिळवून देते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक या परिसरात मनसेची लक्षणीय मते आहेत. या पक्षाला काही मतदारसंघात संधी दिल्यास त्याचा लाभ होऊ शकेल, अशी अटकळ बांधली जात असून, त्या आधारावर प्रारंभिक चर्चा सुरू झाली आहे. मोदींना थोपवण्यासाठी महाआघाडीत शिवसेनेलाही सामावून घेण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने काही दिवसांपूर्वी ठेवला होता. शिवसेनेने अद्याप त्यासंबंधी कोणतीही भूमिका घेतली नसल्याने मराठी मतदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या राज यांना महाआघाडीत घ्यावे, अशी ही योजना आहे.

राज यांच्या नेतृत्वात मनसेने २००९च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सर्व मतदारसंघात एक लाखाहून जास्त मते घेतली होती. गिरगाव ते बोरिवली, तसेच ठाणे, डोंबिवली परिसरात मराठी मते मोठ्या प्रमाणात आहेत. शिवसेनेवर नाराज असलेली ही मते मनसेकडे जाऊ शकतात. काँग्रेस अमराठी आणि अल्पसंख्यांक मतदारांकडे लक्ष ठेवून असते. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई भागात अद्याप पाय रोवून उभे राहता आलेले नाही. 

सर्वोच्च पातळीवर हालचाली सुरू
काँग्रेसच्या एका नेत्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, असा प्रस्ताव चर्चेसाठी अतिवरिष्ठ स्तरावर पुढे करण्यात आल्याचे मान्य करत यासंबंधांतील हालचाली सर्वोच्च पातळीवर होतील, असे त्यांनी मान्य केले. राज यांचा हिंदुत्ववादी दृष्टिकोन, तसेच प्रादेशिकतावाद याबाबत दिल्लीकर श्रेष्ठी काय विचार करतात, ते महत्त्वाचे आहे. मात्र, मोदींसारख्या दमनकारी राजवटीला थोपवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी मान्य केले.

Web Title: marathi news Raj Thackeray Narendra modi BJP MNS maharashtra politics mumbai news