राज ठाकरेंचे थेट प्रश्न; शरद पवारांची दिलखुलास उत्तरं..!

बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज (बुधवार) पुण्यात घेत आहेत. या मुलाखतीत पवार यांच्या तब्बल साठ वर्षांच्या राजकारणातील अप्रतिम किस्से राज यांनी खुमासदारपणे उगडायला सुरूवात केली. राज यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना पवार यांनी सांगितलेले आपल्या जगण्यातील हे काही अनुभव...

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज (बुधवार) पुण्यात घेत आहेत. या मुलाखतीत पवार यांच्या तब्बल साठ वर्षांच्या राजकारणातील अप्रतिम किस्से राज यांनी खुमासदारपणे उगडायला सुरूवात केली. राज यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना पवार यांनी सांगितलेले आपल्या जगण्यातील हे काही अनुभव...

यशवंतराव चव्हाणांबद्दल...
एस एम जोशी यांनी एकदा संसदेत एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर तत्कालीन तरूण मंत्र्यानं उत्तर दिलं. एस एम यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. मंत्र्यानं पुन्हा उत्तर दिलं. तिसऱयांदा एस एम यांनी प्रश्न विचारल्यावर तो तरूण मंत्री त्रस्त होऊन म्हणाला, मी दोनदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तुमच्या डोक्यात शिरत नाही आहे का?
हे उत्तर एेकताच यशवंतराव संसदेत उभे राहिले. त्यांनी सभागृहाची आणि एस एम यांची माफी मागितली. 'उत्तर देणं ही आमची जबाबदारी आहे, हे  आमच्या तरूण मंत्र्यांना समजत नाहीय. त्यांच्यावतीनं मी सभागृहाची आणि एस एम यांची माफी मागतो...', असे यशवंतराव म्हणाले. सामंजस्याची त्यांची भावना आम्ही सभागृहात गॅलरीत बसून पाहात होतो. ती भावना आमच्यात रुजली आहे. 

नामदार गोखलेंबद्दल...
नामदार गोखले हे देशाला दिशा देणारे व्यक्तिमत्व होते. राष्ट्र हे राष्ट्र आहे. महाराष्ट्रासाठी मी हवं ते करेन मात्र मी देशाला कधी विसरणार नाही, ही गोखले यांची शिकवण होती. 

Image may contain: 2 people, closeup

नरेंद्र मोदी यांच्याबद्दल...
एखाद्या व्यक्तीवर महाराष्ट्राची जबाबदारी पडली, तर फक्त पुण्याचा विचार करून चालणार नाही. त्याला मराठवाड्याचा विचार करावा लागेल. कोकणाचा करावा लागेल. मुंबईचा विचार करावा लागेल. आज जगातील कुठलीही व्यक्ती आली, की दोन गोष्टी आम्ही त्याला अहमदाबादला घेऊन जायला लागलोय. गुजरात आणि अहमदाबादच देशात नाहीय फक्त. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. मी दहा वर्षे देशाचा शेती खात्याचा मंत्री होतो. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते शेतीत लक्ष घालणारे होते. त्यांची एकच गोष्ट खटकायची. मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत ते थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर हल्ला करायचे. मनमोहन सिंग सभ्य गृहस्थ आहेत. ते कधी उत्तर द्यायचे नाहीत. प्रधानमंत्र्यांवर व्यक्तिगत हल्ला करणे योग्य नाही, हे काँग्रेसच्या मंत्र्यांना वाटायचे. त्यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांचा मोदींकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसायचा. माझी भूमिका असायची की मोदींचा गुजरात हा भारताचा भाग आहे. आपण राष्ट्राची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे मोदींचा म्हणून गुजरातची जबाबदारी, तिथल्या शेतकऱयांची जबाबदारी टाळता येणार नाही. त्यामुळे मोदी दिल्लीत आले की माझ्या घरी यायचे. आपले प्रश्न मांडायचे. पुढे मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी एक स्टेटमेंट केले. 'यांचे बोट धरून मी राजकारणात आलो...'. या स्टेटमेंटला फार काही अर्थ नाही...

Image may contain: 2 people, people smiling, sunglasses, beard and eyeglasses

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल...
तुमच्या (राज ठाकरे) काकांचे आणि माझे व्यक्तिगत संबंध सलोख्याचे होते. मात्र, एकदा स्टेजवर उभे राहिले की तुमचे काका मला म्हमद्या म्हणायचे. मैद्याचं पोतं म्हणायचे. माझी मुलगी (सुप्रिया सुळे) यांचा राज्यसभेसाठी फॉर्म भरायचे ठरले. 
कुणीतरी मला सांगितले, बाळासाहेबांशी बोला. बाळासाहेब मला म्हणाले, मला कळलंय सुप्रिया राज्यसभेला उभी राहतेय. तुमची काय भूमिका...
मी म्हणालो, मुलगी उभी राहतेय. माझी काय वेगळी भूमिका असणार?
बाळासाहेब म्हणाले, उभी राहू द्या. 
मी म्हणालो, तुमच्या सहकारी पक्षाची काय भूमिका राहील...?
बाळासाहेब म्हणाले, त्याची चिंता करू नका...
पुढं सुप्रिया बिनविरोध निवडून आली...
आम्ही व्यक्तिगत जीवनात इतके जवळ आहोत. अशावेळी व्यक्तिगत टीका करणे मला पटत नाही...

महाराष्ट्रात का परतलो?
1993 च्या दंगलीच्या वेळी मला नरसिंहराव यांनी सांगितलं, देशाच्या अर्थकारणाला बदलणारे काही निर्णय मी घेत आहे. त्याकडं जगाचं लक्ष आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. ती पेटलेली असेल, तर त्याचा गंभीर परिणाम होईल. मुंबई सावरायला तुम्हाला महाराष्ट्रात जावे लागेल...मी रात्रभर विचार करत होतो. मला जायचं नव्हतं. नरसिंहराव म्हणाले, तुम्ही असे कसे आहात. ज्या महाराष्ट्राने तुम्हाला मोठे केले, त्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी तुम्हाला जावेसे वाटत नाही, याचे मला आश्चर्य वाटते...मी अस्वस्थ झालो. नरसिंहराव यांच्या म्हणण्यावर विचार केला. महाराष्ट्रात परतलो..

Web Title: marathi news Raj Thackray Sharad Pawar Interview Narendra Modi