समृद्धी महामार्गासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना स्विकारणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

समृध्दी महामार्ग व कॉरिडोर तयार करण्यासाठी नाविण्यपूर्ण व सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी अभियांत्रिकी रचनाकारांनी संकल्पना तयार करावी, नाविण्यपूर्ण संकल्पना स्विकारली जाईल असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर - समृध्दी महामार्ग व कॉरिडोर तयार करण्यासाठी नाविण्यपूर्ण व सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी अभियांत्रिकी रचनाकारांनी संकल्पना तयार करावी, नाविण्यपूर्ण संकल्पना स्विकारली जाईल असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बांधकामाच्या निर्मितीत आकर्षकता असेल तर ती राज्याची ओळख ठरते. पूर्वी गेट वे ऑफ इंडिया ही मुंबई व राज्याची ओळख होती आता वरळी-वांद्रे सी लिंक राज्याची व मुंबईची ओळख झाली असल्याचे स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे परिषदेच्या उद्घाटना प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संयोजक संघटनेचे अध्यक्ष डी. ओ. तावडे, आय. के. पांडया, तांत्रिक समितीचे अध्यक्ष ए. के. बॅनर्जी, डॉ. वर्षा सुब्बाराव, आर. के.पांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, समृध्दी महामार्गामुळे नागपूरहून मुंबईत केवळ आठ ते दहा तासात पोहचणे शक्‍य होणार आहे. हा प्रकल्प कृषी व उद्योग व विकासासाठी समृध्दी कॅरिडोर म्हणून विकसित केला जात आहे. राज्यातील 24 जिल्हयांतून जाणारा हा महामार्ग कृषी समृध्दीचा महामार्ग ठरणार आहे. गॅस, पेट्रोल, पेट्रोकेमिकल आदी पाईप लाईन या मार्गावर राहणार आहे. तसेच विमान उतरण्याचीसुध्दा सुविधा असणाऱ्या या राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे डिझाईन हे जागतिकस्तराचे असावे. यासाठी सर्व अभियांत्रिकी वास्तुविशारदांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वरळी वांद्रे सीलिंक सोबत वांद्रे ते वर्सोवा नवीन सीलिंक तयार करण्यात येणार आहे. नरीमन पॉईंट ते वरळी समुद्री मार्ग, ट्रान्स हार्बर सीलिंकचे बांधकाम करताना सुरक्षा, सुंदरता व टिकावूपणा याला प्राधान्य आहे. देशातील रस्ते विकासासोबत पूल व बोगद्यांच्या कामाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिशा दिली आहे. प्रास्ताविक डी. ओ. तावडे यांनी केले. आभार संघटनेचे प्रमुख आय. के. पांडे यांनी मानले. युरोपसह विविध देशातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.

Web Title: marathi news samrudhi mahamarg cm devendra fadnavis