अमित शहा यांच्याकडून खडसेंना ग्रीन सिग्नल!

Devendra Fadnavis Eknath Khadse
Devendra Fadnavis Eknath Khadse

जळगाव  : राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि राज्यातील 90 टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा सर्वांत धाडसी निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.

मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर प्रथमच त्यांनी फडणवीस यांच्या बाजूने वक्तव्य केले. अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यावर प्रेमराग आलापल्यामुळे राजकीय क्षेत्रात आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या  झालेल्या बैठकीत खडसे हजर होते. त्यानंतर झालेला हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळात त्यांच्या परतीचे संकेत असल्याचेही बोलले जात आहे. 

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना गैरव्यवहाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला. या घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर खडसे यांनी आपल्याला पक्षातर्गंत खेळी करून मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आले असा जाहीर आरोप केला होता. त्यानंतर अनेक वेळा त्यांनी फडणवीस सरकारच्या कारभाराबाबाबत नाराजी व्यक्त केली होती. थेट विधिमंडळातही त्यांनी सरकारविरूध्द वक्तव्य केले होते.

खडसे विरूध्द मुख्यमंत्री फडणवीस असा संघर्ष असल्याचे भाजप कार्यकर्त्यांतही बोलले जात होते. एवढेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संघर्ष यात्रा काढली त्यावेळी जळगाव जिल्ह्यात खडसेंच्या मुक्ताईनगर मतदार संघात खडसे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्ष नेत्यांनी भेट घेतली होती.

त्यामुळे विधिमंडळातही त्यांचे पडसाद उमटले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी खडसेच्या मंत्रिमंडळातून बाहेर जाण्यावर कटाक्ष टाकला ते म्हणाले, 'कटप्पाने बाहुबली क्‍यो मारा' हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता माहिती करून घेवू इच्छित आहे, त्यासाठीच आम्ही मुक्ताईनगरला गेलो होतो. त्यामुळे खडसे आणि फडणवीस यांच्यात वाद विधिमंडळाच्या माध्यमातून जनतेलाही दिसून आला होता. 

अशा स्थितीत गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या राज्यातील कर्जमाफीच्या निर्णयाचे एकनाथराव खडसे यांनी कौतुक तर केलेच परंतु देशातील सर्वांत धाडसी निर्णय असल्याचे मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांचे खडसे यानीं केलेल्या कौतुकामुळे थेट पक्षातीलच नेते आणि कार्यकर्त्यांसून तर विरोधकांचेही कान टवकारले आहेत. अचानक हा बदल कसा झाला, अशीही आता चर्चा सुरू आहे. 

खडसे यांच्या अचानक झालेल्या मतपरिवर्तनाचे रहस्य थेट अमित शहांच्या मुंबईतील बैठकीत असल्याचे आता सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमेटीत खडसे सदस्य आहेत. शहा मुंबईत दौऱ्यावर आलेले असतांना त्यानी घेतलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीला खहसेही हजर होते. बैठकीनंतर खडसे बाहेर निघत असतांना शहा यांनी खडसे यांच्या हाताला धरून त्यांना भोजन कक्षाकडे नेले,त्यावेळी त्यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

त्यानंतर झालेल्या बैठकीत शहा यांनी काही मंत्र्यांच्या कामावर नाराजी व्यक्त करीत 'मेरे पास ऑप्शन है' असे सांगत त्यांना खडसावले. त्यातूनच खडसे यांचे मंत्रिमंडळातील परतीचे संकेत दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे खडसेंनी मुख्यमंत्र्यावर नरमाईचे धोरण ठेवले असल्याचे दिसत आहे. मात्र याचे उत्तर भोसरी चौकशीच्या निकालानंतरच दिसून येईल एवढे मात्र निश्‍चित तोपर्यंत तरी खडसेंना हेच धोरण ठेवावे लागणार आहे ते ठेवतील काय, अशीही आता चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com