केंद्र व राज्यात थापाड्यांचे सरकार - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

सातारा - केंद्रात व राज्यात थापाड्यांचे सरकार आहे. जे खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे. आता तर नमोरुग्ण पैदा झाले आहेत. त्यांची पाठराखण भाजप करत आहे. जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपलेत, येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे. नरेंद्र मोदी यांचे आज शेवटचे बजेट जाहीर झाले, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारची खिल्ली उडविली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. माजी आमदार नितीन सरदेसाई, राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, राजू पाटील, अभिजित पानसे, रिता गुप्ता, हाजी सैफ शेख, अविनाश जाधव, स्वाती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांचा, तसेच एकमेव बिनविरोध झालेल्या न्हाळेवाडी ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. भाजपचे पांडुरंग पवार यांनी मनसेत प्रवेश केला.

श्री. ठाकरे म्हणाले, 'दळभद्री राजकारण्यांनी या देशाचे वाटोळे केले. राजीव गांधींनंतर 30 वर्षांनी मोदींना बहुमत मिळाले. ते येण्यासाठी किती थापा मारल्या? आज महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला, तर शिवाजी महाराजांच्या मनाला किती त्रास होत असेल. ज्या औरंगजेबाला शेवटपर्यंत शिवाजी नावाचा विचार मारता आला नाही, तो महाराष्ट्र आज जाती-पातीत अडकला आहे.''

शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा समुद्रात उभा करायचा हे तुमच्या समोर दाखवलेलं फक्त एक चित्र आहे. महाराजांचे खरे स्मारक हे गडकिल्ले आहेत. त्यांचे संगोपन करून त्यांचा इतिहास जगापुढे मांडता येईल. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढताहेत. मला कळत नाही, ते रतन खत्रीकडे कामाला होते का? गुजरातच्या खोट्या प्रतिमेचा उदो उदो करून संपूर्ण देशाला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. परदेशातील कोणतीही प्रमुख व्यक्ती देशात आली तर तिला केवळ गुजरातमध्येच नेले जाते, का? आमचा महाराष्ट्र नाही का? केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशात विकास झाला नाही का? आज मांडलेला अर्थसंकल्प देशाचा नसून केवळ आगामी निवडणुकीचा आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर माझा विश्‍वास नाही, असेही त्यांनी नमूद केले.

नितीन गडकरींवरही त्यांनी टीकेची झोड उडविली.
संदीप मोझर म्हणाले, 'आपण जी आंदोलने उभी केली त्याला ठाकरे साहेबांचा पाठिंबा आहे. आपल्याकडे कष्ट आणि निष्ठा आहे. बाळा नांदगावकर आणि माझ्यात गैरसमज केला. ती माझी चूक होती. ज्यावेळी पुन्हा कार्यक्रम असतील त्या वेळी नांदगावकर सुद्धा सहभागी असतील.''

सातारा वटणीवर नाही...
साताऱ्याविषयी बोलताना ठाकरे म्हणाले, 'रत्नागिरीला गाडीतून जाताना करायचे काय प्रश्‍न पडतो, म्हणून जराशी डुलकी लागली. संदीपला वाटले, मी थांबलो नाही. आज खूप वर्षांनंतर साताऱ्यात आलो. सातारा बदलला आहे; पण वटणीवर आलेला दिसत नाही.''

अनेकांना गुंडाळायचे आहे....
संदीप मोझर आपल्या भाषणात म्हणाले, ""यापुढे मनसे माझा शेवटचा पक्ष आहे. मी जाईन त्या वेळी मनसेच्या ध्वज माझ्या शरीरावर लपेटला असेल.'' हा धागा पकडून ठाकरे म्हणाले, की संदीप मोझर हा खूप भोळा, भाबडा आहे, म्हणूनच या सर्व गोष्टी घडतात. तुम्ही इतक्‍यात झेंड्यात लपेटून जाऊन कसे चालेल? सातारा मनसेचा बालेकिल्ला करण्यासाठी जिल्ह्यातील अनेकांना आपल्याला गुंडाळायचे आहे.

राज ठाकरे म्हणाले...
- शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत
- धर्मा पाटील गेले तेव्हा मुख्यमंत्री स्वित्झर्लंडमध्ये अंगावर बर्फ घेत होते
- एकदा तरी माझ्यावर विश्‍वास ठेवा. सत्ता देऊन बघा.
- मुख्यमंत्र्यांनी बांधलेल्या 36 हजार विहिरी आहेत कोठे?

Web Title: marathi news satara news maharashtra news raj thackeray meeting politics