शौर्य केलं कोणी अन् छाती फुगवतयं कोण-  शरद पवार यांची पंतप्रधानावर टिका

live
live

नाशिक- पाकव्याप्त काश्‍मिर भागात हवाई हल्ले केल्याने जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली असून त्याचे सर्वश्रेय सैनिकांना जाते. परंतू भाजपकडून हल्ल्याचे राजकारण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शौर्य केल्याचे गावागावात झेंडे नाचवून देखावा निर्माण केला जात आहे. सैन्याच्या शौर्याचे राजकारण करण्याचा हा किळसवाणा प्रकार असून शौर्य केले कोणी अन छाती फुगवतयं कोण या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडताना नाकर्त्या सरकारला सत्तेतून बाहेर फेकण्याचे आवाहन केले. 

  नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले, दिल्लीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हल्ल्याचे राजकारण करायचे नाही असे ठरले असताना देखील पंतप्रधानांपासून ते अमित शहा यांच्यापर्यंत भाजपचे सर्वचं नेते श्रेयाच्या राजकारणात गुंतले. जिनिव्हा करारानुसार वैमानिक अभिनंदन यांना पाकिस्तानने सोडले त्या घटनेचा राजकीय फायदा घेवू नये असे अभिनंदन यांच्या पत्नीने भाजप नेत्यांना उद्देशून सांगावे लागले हे दुर्देव्य आहे. संरक्षण मंत्री असताना स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पाकिस्तानला पहिला झटका दिला.

इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून इतिहासचं नाही घडविला तर त्या देशाचा भुगोल देखील बदलल्यानंतर सैन्याच्या शौर्याचे राजकारण झाले नाही. परंतू भाजपकडून सध्या शौर्याचे जे राजकारण सुरु आहे ते देशाला परवडणारे नाही. सरकारला साडे चार वर्षात ठोस कामे करता आली नाही. परदेशातील काळा पैसा आणण्याचे आश्‍वासन फसले. नोटाबंदीतून कष्टकऱ्यांच्या कमाईच्या पैसा काळा पैसा ठरवून त्यावर घाला घातला गेला. युपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांना सरसकट संपुर्ण कर्जमाफी दिली. मात्र भाजप सरकारने दोन हजार रुपये बॅंक खात्यावर जमा करण्याची घोषणा करून चेष्टा केली. भाजप म्हणजे लबाडा घरचं आवतणं आहे हे आवतणं आता लोकांना कळलं असून निवडणुकीच्या निमित्ताने लबाडांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. 

गांधी कुटूंबियांचे योगदान 
पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी लोकशाहीचा पाया मजबुत केला. संघर्षाच्या काळात इंदिरा गांधींनी देशाला सक्षम नेतृत्व दिले. राजीव गांधी यांनी देशाला आधुनिक विज्ञानाची दृष्टी दिली असे असताना त्यांच्या हत्या होत असेल तर देशाला अजून किती योगदान हवे असा सवाल करताना श्री. पवार यांनी गांधी कुटूंबाला बदनाम करणारे पंतप्रधान संकुचित मनाचे असून त्यांच्याकडून देशाच्या प्रगतीची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे सांगितले. 

दाल मे कुछ काला 
मोदी भ्रष्ट्राचार बंद करणार होते तर राफेल विमानाची किंमत 530 कोटींहून 1600 कोटी रुपयांपर्यंत कशी पोहोचली? संरक्षण विभागात एजन्ट नसावे असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेताना तसे आदेशित केले होते मग अंबानींचा संबंध कसा आला? मिग कराराप्रमाणे राफेल विमाने विकत घेवून देशात उत्पादन करायचे होते मग अंबानींच्या कंपनीला राफेलच्या सर्व्हिसिंगचे काम दिलेचं कसे? त्याच काळात नागपुरच्या एमआयडीसीत अंबांनी यांनी 300 एकर जागचे उदघाटन केले, हे काम नाशिकच्या एचएएल कंपनीला का दिले नाही? आदी प्रश्‍न उपस्थित करून पवार यांनी दाल मे कुछ काला है असल्याचे सांगतं राफेल खरेदीवर शंका उपस्थित केली. 

पवार म्हणाले, 
- 7 किंवा 8 मार्चला आचारसंहिता लागण्याची शक्‍यता. 
- निवडणुक यंत्राबाबत नाही परंतू सरकारच्या भुमिकेवर संशय. 
- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांवर नजर ठेवावी. 
- देशात भाजपची सत्ता आल्यास लोकशाही संपुष्टात येणार. 
- 5 वर्षात काहीचं करता न आल्याने सरकारचा रडीचा डाव. 
- राफेल शब्द भ्रष्ट्राचाराच्या व्याख्येत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com