शिवरायांच्या जयघोषाने शिवजन्मभूमी दुमदुमली 

दत्ता म्हसकर
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

जुन्नर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो शिवप्रेमींच्या "छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषाने किल्ले शिवनेरीचा परिसर आज दुमदुमून गेला होता. शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडाहून शेकडो शिवज्योती विविध ठिकाणी मार्गस्थ झाल्या. 

जुन्नर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो शिवप्रेमींच्या "छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषाने किल्ले शिवनेरीचा परिसर आज दुमदुमून गेला होता. शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडाहून शेकडो शिवज्योती विविध ठिकाणी मार्गस्थ झाल्या. 

शिवनेरीवर शिवजन्मस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार आशिष शेलार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आमदार शरद सोनवणे, देवदत्त निकम, अतुल बेनके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्माचा सोहळा झाला. पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी शिवजन्मस्थानी पाळणा म्हटला. यानंतर सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. पोलिस पथकाकडून पारंपरिक वाद्यवृंदात राष्ट्रगीताचे गायन करून बंदुकीच्या फैरींची सलामी देण्यात आली. 

अभिवादन सभेवेळी ऋषिकेश काळे आणि सहकाऱ्यांनी पोवाड्याचे गायन केले. या वेळी तावडे म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक होते. नवीन अभ्यासक्रमात त्यांच्या व्यवस्थापनशास्त्राचा समावेश करण्यात येणार आहे.'' या वेळी आमदार विनायक मेटे, राजेंद्र कुंजीर, कैलास वडघुले, राजेंद्र बुट्टे, रवींद्र काजळे, सुनील ढोबळे, नंदकुमार तांबोळी आदी उपस्थित होते. 

दरम्यान, आज सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते शिवाईदेवीची महाआरती व अभिषेक करण्यात आला. 

किल्ल्यावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. असंख्य शिवभक्त हातात भगवा झेंडा फडकावत "जय जिजाऊ, जय शिवराय', "जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा देत दिवसभर गडावर येत होते. मैदानी खेळ व मल्लखांब प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वनविभागाच्या वतीने किल्ल्यावर वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर, नामदेवशास्त्री हरड, उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, जुन्नरच्या पंचलिंग चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याजवळचा परिसर ढोल- ताशांच्या गजराने, तसेच भगव्या झेंड्यानी शिवमय झाला होता. 

शुभेच्छा न देताच मुख्यमंत्री परतले 
शिवनेरीवरील जन्म सोहळ्यानंतर होणाऱ्या सांस्कृतिक व मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकास उपस्थित राहून मुख्यमंत्री शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतात. परंतु, या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेस शुभेच्छा न देताच निघून गेले. 

"भाजप सरकार हाय हाय'च्या घोषणा 
किल्ले शिवनेरीवर शिवप्रेमींना गडावरती जाण्यासाठी सकाळच्या सत्रात पोलिसांनी रोखले. त्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले होते. शिवप्रेमींनी गडावरून खाली उतरत असताना विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना अडवत, "भाजप सरकार हाय हाय' अशा घोषणा दिल्या. या वेळी शिवप्रेमींनी ही "व्हीआयपी' संस्कृती बंद करण्याची मागणी केली. पास असलेल्या शिवप्रेमींनाच गडावर सोडण्यात येत होते. त्यामुळे हजारो शिवभक्तांना गडाच्या पायथ्यावरूनच माघारी जावे लागले. त्यामुळे या शिवभक्तांनी संतापून मंत्र्यांना रोखले.

Web Title: marathi news shivaji maharaj jayanti junnar shivneri