‘नारायणास्त्रा’मुळे शिवसेना लागली कामाला

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 मार्च 2018

मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपने शिवसेनेविरोधात नारायणास्त्र वापरल्यास त्याला पुरून उरण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. कोकणातील गड अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. ठाकरे यांनी बुधवारी (ता. ७) खास कोकणातील पदाधिकारी, मंत्र्यांची बैठक घेऊन तेथील समस्यांबाबत चर्चा केल्याचे समजते.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शिवसेनेने एकट्याने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोकणात शिवसेनेचे पुन्हा वर्चस्व निर्माण झाले आहे. या वर्चस्वाला धक्का द्यायचा झाल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्यासारखा मोहरा हाती असणे भाजपला आवश्‍यक आहे. त्यासाठीच त्यांना एनडीएमध्ये सामावून घेतले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप राणे यांना बळ देणार असल्याचे निश्‍चित असल्याने शिवसेनेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नाणार रिफायनरीला प्रखर विरोध करण्यास सुरवात केली. स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेण्याबरोबर कोकणातील रखडलेल्या विकासकामांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारच्या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेतली असल्याचे समजते. 

मुख्यमंत्र्यांची जबाबदारी 
पत्रकारांशी बोलताना नाणार प्रकल्पाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर ढकलली. मुख्यमंत्र्यांना गावकऱ्यांसोबत जेव्हा भेटलो तेव्हाच त्यांनी स्वत: जनतेच्या मनाविरुद्ध प्रकल्प लादणार नाही, असे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: marathi news shivsena narayan rane bjp politics