साखर उद्योग संकटात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुणे - राज्यात उत्पादित होणाऱ्या साखरेची तातडीने खरेदी करून सरकारने साखर उद्योगाला आधार देण्याची गरज असल्याची भावना साखर उद्योगाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे दुप्पट उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेचे भाव कोसळले असून, साखर उद्योग संकटात सापडला आहे. 

पुणे - राज्यात उत्पादित होणाऱ्या साखरेची तातडीने खरेदी करून सरकारने साखर उद्योगाला आधार देण्याची गरज असल्याची भावना साखर उद्योगाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे दुप्पट उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेचे भाव कोसळले असून, साखर उद्योग संकटात सापडला आहे. 

राज्यात यंदा उसाचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत राज्यात 80 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. अद्यापही 20 ते 22 टक्के ऊस गाळप शिल्लक आहे. त्यातून यंदा साखरेचे उत्पादन 90 लाख मेट्रिक टनापर्यंत होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. साखरेच्या वाढलेल्या उत्पादनामुळे देशातील साखरेचे दर प्रतिक्‍विंटल दीडशे रुपयांनी घसरले आहेत. उत्पादित साखरेची विक्री करण्यासाठी पोषक वातावरण बाजारपेठेत नाही. त्याचा थेट परिणाम कारखान्यांवर होत आहे. उत्पादित साखरेची विक्री करण्यासाठी योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन ही साखर खरेदी करावी, अशी भावना साखर कारखान्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. 

राज्यातील साखर सरकारने विकत घ्यावी, ती कारखान्यांच्याच गोदामात ठेवून योग्य वेळी तिची विक्री करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारपुढे आहे. मात्र, अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही. हा निर्णय सरकारने तातडीने घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे. 

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन वाढले असले तरीही हे उच्चांकी उत्पादन नाही. यापूर्वीही राज्यातून यापेक्षा अधिक उत्पादन झाले आहे, असेही साखर आयुक्तालयातर्फे सांगण्यात आले. 

राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ म्हणाले, ""राज्यात साखरेचे सुमारे 18 लाख मेट्रिक टन जास्त उत्पादन होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.'' 

दुहेरी किंमत धोरणाचा प्रस्ताव विचाराधीन 
साखर उद्योगाला आधार देण्यासासाठी दोन पर्याय असल्याची चर्चा सध्या साखर आयुक्तालयात सुरू आहे. त्यापैकी राज्याने साखर खरेदी करणे हे राज्य सरकारच्या अखत्यारित आहे; तर साखर विक्रीसाठी दुहेरी किंमत धोरणाचा केंद्रातर्फे विचार सुरू आहे. त्यानुसार किरकोळ साखर खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकांसाठी एक किंमत, तर उद्योगांसाठी वेगळा दर निश्‍चित करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती पुढे येत आहे.

Web Title: marathi news sugar factory maharashtra