तनिष्कांनी उभारली प्लॅस्टिकमुक्तीची गुढी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

पुणे - तनिष्का व्यासपीठाच्या पाचव्या वर्धापनदिनी राज्यभरातील हजारो तनिष्का सदस्यांनी महिला सुरक्षततेची, पर्यावरण रक्षणाची विशेषतः प्लॅस्टिकमुक्तीची, कचरा व्यवस्थापनाची गुढी आज उत्साहाने उभारली. सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला कृतिशील साथ देण्याचा निर्धार करण्यात आला.

पुणे - तनिष्का व्यासपीठाच्या पाचव्या वर्धापनदिनी राज्यभरातील हजारो तनिष्का सदस्यांनी महिला सुरक्षततेची, पर्यावरण रक्षणाची विशेषतः प्लॅस्टिकमुक्तीची, कचरा व्यवस्थापनाची गुढी आज उत्साहाने उभारली. सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला कृतिशील साथ देण्याचा निर्धार करण्यात आला.

तनिष्का व्यासपीठाची सुरवातच कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात स्त्रीप्रतिष्ठेची गुढी उभारून झाली. यंदाही तीच परंपरा जपत, किनवट (जि. नांदेड) सारख्या आदिवासी भागासह सुमारे ३२ जिल्ह्यांत तनिष्का सदस्यांनी वर्धापन दिन साजरा केला. प्रत्येक जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तनिष्कांशी संवाद साधला. तसेच, मुलींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘तनिष्का सुरक्षा बॉक्‍स’ पन्नासपेक्षा जास्त शाळा, महाविद्यालयांत ठेवण्यात आले आहेत. उपक्रमाचा हाच धागा पकडून पाडव्याला तनिष्कांनी सुरक्षिततेबाबत विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार केला. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेला सप्तशृंगी गड प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार तनिष्कांनी केला. नाशिक जिल्ह्यात सर्व तालुक्‍यांत, छोट्या गावांमध्येही तनिष्कांनी गुढ्या उभारल्या. जळगावमधील तनिष्कांनी कचरा व्यवस्थापनाचा वसा घ्यायचे ठरवले आहे.  

मुंबई, पालघर, ठाणे येथेही तनिष्कांच्या गुढ्या डौलात उभ्या राहिल्या. पुणे जिल्ह्यात भोर, पसुरे (भोर), जुन्नर, ओतूर, ओझर, काळवाडीसह शहरात तनिष्का एकत्र आल्या. पुण्यात सुखसागरनगर येथे तनिष्का गटांनी एकत्र येऊन स्वच्छतेचा संकल्प केला. साताऱ्यात तनिष्का गटांनी पाणीबचत, प्लॅस्टिकबंदीचे स्वागत, स्वच्छतेचा निर्धार केला. सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगाव (ता. खंडाळा) येथे सुरक्षेची गुढी उभारून ‘लेक वाचवा व लेक शिकवा’ असा संदेश तनिष्कांनी दिला. सोलापूर जिल्ह्यातही छोट्या छोट्या गावांत आज तनिष्कांचे अस्तित्व जाणवत होते. नगर जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.

विदर्भ, मराठवाड्यात तनिष्कांनी महिला सुरक्षिततेलाच प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. किनवटमध्ये तनिष्कांनी स्वतःभोवतीचे वातावरण बदलण्याचे ठरवले आहे.नांदेड शहरात शाळेतील मुलींच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

उद्यमशीलतेचा संकल्प
लातूर जिल्ह्यात आनंदवाडी (निलंगा) येथे तनिष्कांनी गावात एकच सार्वजनिक गुढी उभारली. उद्योजकता वाढवण्यासाठी विविध कामांचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. ओझर, लेण्याद्री या अष्टविनायकांच्या गावात कागदी पिशव्या वापरण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यात जुन्नरमधील तनिष्कांचा सहभाग आहे. 

Web Title: marathi news Tanishka plastic women maharashtra