सिंहगडाप्रमाणे शिवनेरीचे थ्रीडी मॅपिंग - विनोद तावडे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

ओतूर - सिंहगडापाठोपाठ शिवनेरी किल्ल्याचे थ्रीडी मॅपिंग करून छत्रपती शिवरायांचा इतिहास खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

ओतूर - सिंहगडापाठोपाठ शिवनेरी किल्ल्याचे थ्रीडी मॅपिंग करून छत्रपती शिवरायांचा इतिहास खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

किल्ले शिवनेरीवरील शिवजन्म सोहळ्यानंतर शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या पटांगणात आयोजित जाहीर सभेत तावडे बोलत होते. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, मुंबई भाजप प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समिती सभापती संजय काळे, पुण्याचे नगरसेवक विशाल तांबे, भाजपचे भगवान घोलप, नंदू तांबुळी; तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती व शिवप्रेमी उपस्थित होते.

तावडे म्हणाले, ‘‘यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यातील भाजप सरकार काम करत असल्यामुळे शिवनेरी महोत्सव आयोजित केला आहे. शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते. त्यामुळे ‘शिवाजी- दी मॅनेजमेंट गुरू’ या विषयाचा पाठ्यपुस्तकात समावेश केला आहे. कृतिशील शिक्षण व स्पोकन इंग्लिश हे उपक्रम राबविल्यामुळे २५ हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून मराठी शाळेत आले, त्यात सर्वांत जास्त विद्यार्थी जुन्नर तालुक्‍यातील आहेत. दिल्लीत प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या ‘शिवराज्याभिषेका’च्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला.’’

‘‘सरकारने २२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कर्जमाफीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली असून, ५ कोटींपेक्षा जास्त घरात गॅस पोचविला. २५ ते ३० हजार कोटी कुटुंबांना काहीना काही प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फायदा सरकारने पोवला आहे,’’ असे तावडे यांनी सांगितले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित झाला असू,य्यिाबाबतचा शासन निर्णय येत्या काही दिवसांत जाहीर होईल. यानंतर दोन हजार कोटींची विकासकामे तालुक्‍यात होणार आहेत.’’

या प्रसंगी खासदार आढळराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार शरद सोनवणे प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘मी मनसेचा एकटा आमदार असूनही भाजप सरकारने आपला माणूस म्हणून स्वीकारले. जिल्ह्यात सर्वांत जास्त निधी जुन्नरला दिला. तसेच ‘मॉडर्न फोर्ट’मधील पहिल्या पाच किल्ल्यांत शिवनेरीचा समावेश केला.’’ 

पंकज गावडे यांनी सूत्रसंचालन केले. जुन्नरचे नगराध्यक्ष श्‍याम पांडे यानी आभार मानले.

Web Title: marathi news vinod tawde shivjayanti otur shivneri 3D mapping