विमानतळांवर करमुक्त वाइन विक्रीवर भर 

residenational photo
residenational photo

नाशिक ः "वाइन कॅपिटल ऑफ इंडिया' म्हणून जगाच्या नकाशावर स्थान मिळविलेल्या नाशिकमधील वाइनच्या विक्रीसाठी आता उत्पादकांनी "ट्रॅव्हल रिटेल'च्या नव्या "चॅनल'वर भर दिलाय. देशातील 24 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळांपैकी अधिक प्रवाशांची वर्दळ राहणाऱ्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू विमानतळांवरून करमुक्त वाइन विक्री व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले. 

महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे एक कोटी 35 लाख लिटर वाइनचे उत्पादन होते. त्यातील चाळीस टक्के वाइन राज्यात खपते. आठ टक्‍क्‍यांपर्यंत वाइनची निर्यात होते, तर उरलेली 52 टक्के वाइन दिल्ली, पंजाब, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ, सिक्कीम, आसाम या राज्यांतून विकली जात आहे. केरळ, बिहार, गुजरातमध्ये दारूबंदी असली, तरीही केरळमध्ये वाइन विक्रीला मुभा आहे. मात्र अजूनही पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात वाइनला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. मुळातच देशांतर्गत वाइनची मागणी वाढत आहे.

 वाइन द्राक्षांचा अपेक्षित नसलेला पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली स्पर्धा अशी कारणे ध्यानात घेऊन उत्पादकांनी देशांतर्गत वाइन विक्रीकडेदेखील लक्ष वळविले. 


पंधरा देशांमध्ये वाइनची निर्यात 
इंग्लंड, स्पेन, फ्रान्स, जपान, अमेरिका, रशिया अशा जवळपास पंधरा देशांमध्ये वाइनची निर्यात केली जाते. वाइन उत्पादनात आघाडीवर असलेल्या सुला विनियार्डसतर्फे निर्यातीपेक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून करमुक्त वाइनच्या विक्रीला विशेष पसंती दिल्याचे चित्र पुढे आले आहे. दोन वर्षांमध्ये विक्री व्यवस्थेसाठी देशांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र दोन्ही वर्षांमध्ये चार लाख लिटरच्या आसपास वाइनची निर्यात राहिली. जिल्ह्यातून साडेचार लाख लिटरच्या आसपास निर्यात झाली. विमानतळावरून करमुक्त वाइन विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. सुलाने गेल्या वर्षी तीन विमानतळांवरून 74 हजार लिटर वाइनची विक्री केली होती. ती यंदा एक लाख लिटरच्या पुढे पोचली आहे. 

वाइनच्या माध्यमातून द्राक्षपंढरीतील पर्यटनवृद्धीला हातभार लागला आहे. वाइन उत्पादकांच्या माध्यमातून वर्षाच्या विविध कालावधीत महोत्सव भरविण्यात येतात. वाइन विक्री व्यवस्थेसाठी महोत्सव हा एक चांगला मार्ग उत्पादकांना गवसला आहे. त्यानंतर जगातील वाइनच्या स्पर्धेत आपली वाइन उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बदलत्या बाजारपेठेच्या पार्श्‍वभूमीवर उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील विक्रीचा मार्ग धुंडाळला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे विक्रीअभावी पडून राहणाऱ्या वाइनचे प्रमाण अलीकडील काळात कमी होत चालले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com