दूरशिक्षण पद्धतीतून शिकल्याचा अभिमान बाळगा  कुलगुरू डॉ. चांदेकर

residenational photo
residenational photo

नाशिक : शालेय शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणापर्यंत पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अद्यापही साधारणत: पंचवीस टक्‍यांपर्यंतच आहे. हे पंचवीस टक्‍के विद्यार्थी नियमित शिक्षण पद्धतीतून शिक्षित होताहत. पण, उर्वरित 75 टक्‍के व्यक्‍तींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी दुरशिक्षणाची आहे. बदलत्या काळात पूर्णवेळ शिक्षण पद्धती कालबाह्य झाली असून, दूरशिक्षण पद्धती हा भविष्यातील एकमेव पर्याय असेल. त्यामूळे विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण पद्धतीतून शिकल्याचा न्यूनगंड न बाळगता अभिमान बाळगायला हवा, असे प्रतिपादन अमरावतीतील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी आज येथे केले. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्या 24 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना डी. लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांच्यासह विविध विद्याशाखांचे संचालक या वेळी उपस्थित होते.

समारंभात 1 लाख 54 हजर 440 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. 
कुलगुरू डॉ. चांदेकर म्हणाले, की शिक्षणाची निर्मिती समाजाच्या उन्नतीसाठी झाली असून, मुक्‍त शिक्षण पद्धती समाजाभिमुख आहे. या शिक्षण पद्धतीत भविष्यातील बदल लक्षात घेऊन कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची संधी आहे. कुलगुरू डॉ. वायुनंदन यांनी अहवाल वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले. समारंभापूर्वी विद्यापीठ प्रांगणात स्नातकांची मिरवणूक काढण्यात आली. 

एकलव्य शिक्षण पद्धती ठरेल प्रभावी : ताकवले 
डिजीटल युगात तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत. 2025 पर्यंत सत्तर टक्‍के नोकऱ्या संपुष्टात आलेल्या असतील, असा अंदाज आहे. अशा वेळी माणसाला काम काय उरेल, हा मोठा प्रश्‍न आहे. काळानुरूप शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्‍यक ठरते. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता, दूरशिक्षणातून नवीन शिक्षण नव्या प्रकारे देण्याची आवश्‍यकता आहे. स्वयंअध्ययनातून उच्च पातळी गाठता येणे शक्‍य असलेली एकलव्य शिक्षण पद्धती भविष्यात प्रभावी ठरेल, असे मत डॉ. ताकवले यांनी व्यक्‍त केले. 

चौदा विद्यार्थ्यांना सुवर्णपदक 
समारंभात 14 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. त्यात, काजल ठाकूर (बी. ए.), स्वाती राहाटे (बी. लिब), वसुंधरा इगवे (वृत्तपत्रविद्या), मोनाली राळेकर (एमबीए), अफीरीन कवचाली (एम. कॉम.), वर्षा माळी (बी. कॉम.), स्मिता ढाकणे (बी. एड.), प्रियांका विसे (बी. एस्सी. ऍग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर), प्रकाश कामटे (बी. सी. ए.), कोमल जुनेजा (बी. एस्सी.- एचएससीएस), तौशीफ सामनानी (बी. एस्सी. एचटीएम), बीना शर्मा (बी. आर्च), शिखर सिंग (बी. टेक- मरीन इंजिनीअरिंग), वैष्णवी चाळके (बी. एस्सी. एमएलटी) यांचा समावेश आहे. 
 

प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध 
विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचित केल्याप्रमाणे गेल्या सहा वर्षांतील दीक्षांत समारंभात पदवी प्रदान केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी नॅशनल ऍकॅडमिक डिपॉझिटरी या कंपनीशी करार झाला आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी करून पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात मिळविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. घाटुळे यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com