शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष रिकामे करणार : नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मी नागपूरपासून सुरवात करून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. मग पुढील राजकीय वाटचालीबाबतचा निर्णय घेईन.
- नारायण राणे

कुडाळ : तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो, असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा म्हणजेच आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे घोषित केले. दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही रिकामे करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

अलीकडच्या काळात नारायण राणे आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आपली पुढील राजकीय वाटचाल लवकरच निश्चित करू, असे त्यांनी स्पष्ट केले. दसऱ्यापूर्वी घोषणा करून नवी दिशा स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्रिपदाबाबत चाचपणी करण्यासाठी त्यावेळी प्रणव मुखर्जी, अँटनी आणि दिग्विजयसिंह हे निरीक्षक म्हणून आले होते. तेव्हा 48 आमदारांनी मला पसंती दिली, तर 32 आमदारांनी अशोक चव्हाण यांना पसंती दिली होती. तरीही मला संधी देण्यात आली नाही. महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांनाच पक्ष वाढवायचा नाही. तेच पक्षातील नेत्यांवर कुरघोड्या करत आहेत. त्यामुळे मला चारवेळा मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. पक्षात आल्यानंतर सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन काँग्रेसने मला दिले होते, मात्र ते पाळले नाही, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यातील 25 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. अनेक लोक, पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. मी नागपूरपासून सुरवात करून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. मग पुढील राजकीय निर्णय घेईन. नांदेड येथेही जाऊन अशोक चव्हाण यांना दाखवून देणार आहे की, ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असूनही माझ्या पाठीशी त्यांच्यापेक्षा जास्त लोक आहेत, असे राणे यांनी सांगितले. 

राज ठाकरे स्वतःच फुटबॉल
राणे यांचा फुटबॉल झालाय असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर राणे म्हणाले, राज हे स्वतःच फुटबॉल आहेत. माझ्या घरात दोन आमदार आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षात एकूण आमदार एकच आहे. त्यांच्या टीकेला उत्तर द्यावे असे मला वाटत नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी राज यांची खिल्ली उडवली.

शिवसेनेचे 27 आमदार राजीनाम्याच्या तयारीत
आपण शिवसेनेत परत जाणार नाही असे स्पष्ट करून नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे फक्त दररोज सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे देत आहेत. परंतु काही करत नाहीत. 

नारायण राणे म्हणाले...

  • मी काँग्रेस आणि विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला : राणे 
  • मी पत्र पाठवून आभार मानले, सोनिया गांधी किंवा राहुल गांधींवर टीका केली नाही : नारायण राणे 
  • तुम्ही काय आम्हाला बरखास्त करता, आम्ही तुम्हाला सोडून देतो : नारायण राणे 
  • हवं ते मंत्रिपद मागा म्हणून मला पृथ्वीराज चव्हाणांनी महसूल काढून उद्योगमंत्री दिलं : राणे 
  • बारा वर्षातील माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही : नारायण राणे 
  • अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन विलासराव देशमुखांविरोधात तक्रार केली : नारायण राणे 
  • विधानपरिषदेत गेलो, विरोधी पक्षनेत्याच्या बाजूला मला बसायला द्यायला हवं होतं. मी सीनियर असून गटनेता केलं नाही : राणे 
     
Web Title: marathi political news narayan rane leaves congress, resigns as mla